देशातील या शहराचे पाणी पिण्यासाठी सर्वात शुद्ध


मुंबई : नेहमीच देशभरातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चर्चा होत असते. कोणत्या शहराचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत अनेकदा शंका व्यक्त केल्या जातात. पण पिण्यासाठी मुंबईतील पाणी सर्वात शुद्ध असल्याचे विविध चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. इंडियन स्टँडर्ड ब्युरोकडून पिण्याच्या पाण्याबाबत करण्यात आलेल्या चाचणीनंतर 20 शहरांच्या रँकिंगमध्ये मुंबईतील पाणी हे शुद्धतेच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर आहे. मुंबईचे पाणी इतर शहरांच्या तुलनेत पिण्यासाठी अधिक योग्य असल्याचे समोर आले आहे.

पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्या देशभरातून समोर येत असताना प्रमुख 20 शहरांच्या पिण्याच्या पाण्याची द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डने (BIS) चाचणी करण्याचे ठरवले. आता या शहरांमधील पाण्याच्या चाचण्याचा अहवाल समोर आला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे बीआयएसने नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत पडताळणी केली. ही पडताळणी विविध 10 निकषांवर करण्यात आली. यामध्ये देशातील विविध 20 राज्यांच्या राजधानींचा समावेश होता. यामध्ये गांधीनगर, मुंबई, दिल्ली, पाटणा, कोलकाता, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांचा समावेश होता. जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व भारत सोडून महत्वाच्या सर्वच शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पडताळणी करण्यात आली.

यामध्ये नळाद्वारे मुंबईत सर्वात शुद्ध पाणी येत असल्याचे अहवालात समोर आले आहे. तर विकसित राज्य असलेल्या गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नळाद्वारे येत असलेले पाणीही अशुद्ध असल्याचे समोर आले आहे. अहवालात त्या खालोखाल पाटणामध्ये उपलब्ध असलेले मातीमिश्रित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आल्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. 2024 पर्यत देशात प्रत्येक घरात पिण्याच्या नळाद्वारे शुद्ध, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष आहे. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment