आजपासून बंद झाल्या ट्विटरवरील राजकीय जाहिराती


मुंबई – जागतिक स्तरावरावरील सर्व राजकीय जाहिराती स्वीकारणे ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटने अधिकृतपणे बंद केले आहे. यापूर्वी ट्विटरवरून कोणत्याही प्रकारच्या राजकीय जाहिराती स्वीकारल्या जाणार नाही, अशी माहिती ‘ट्विटर’चे सीईओ जॅक डॉर्सी यांनी दिली होती. त्यानंतर जॅक यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी या आठवड्यापासून सुरू झाली आहे. तेव्हा आजपासून ट्विटर कोणताही उमेदवार, पक्ष, सरकार, अधिकारी, नेते, राजकीय संस्था आदींकडून राजकीय जाहिराती स्वीकारणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ट्विटर कोणत्याही प्रकारच्या राजकीय मजकूराची जाहिराबाजी करण्याच्या संकल्पनेचे खंडन करते. जनसामान्यपर्यंत राजकीय संदेश हा पोहोचला पाहिजे, लोकांपर्यंत पोहचायची कला कमवावी लागते, ती विकत घेऊन चालत नसल्याचे आम्ही मानतो आणि याच मान्यतेवर आम्ही राजकीय जाहिराती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट कंपनीने शुक्रवारी केले आहे.

व्यावसायिक जाहिरातदारांसाठी इंटरनेटवरून जाहिरात करणे हे अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असल्यामुळे राजकारणासाठी काही मोठे धोके निर्माण होतात, असल्याचे ट्विट सीईओ जॅक डॉर्सी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी केले होते. ट्विटरच्या या निर्णयामुळे आता फेसबुकसारख्या मोठ्या सोशल मीडिया साइटवर दबाव वाढला आहे.

Leave a Comment