9 वर्षात जन्माला आल्या फक्त मुली, महापौर म्हणतात मुलगा जन्माला घाला बक्षिस मिळवा


वारसा – पोलंड आणि झेक प्रजासत्ताकाच्या सीमेवर असलेल्या मिजस्के ओड्र्स्की या गावात गेल्या नऊ वर्षांत कोणत्याही मुलाचा जन्म झालेला नाही. 2010 मध्ये येथे शेवटच्या वेळी मुलाचा जन्म झाला होता, परंतु त्याने आपल्या कुटुंबासमवेत गाव सोडले. आता येथील सर्वात लहान मुलगा 12 वर्षांचा आहे. या गावात मुली जन्माला येतात पण मुले जन्माला येणे फार कमी असते. म्हणूनच या ठिकाणाच्या महापौरांनी ज्या कुटूंबाच्या घरात मुलाचा जन्म होईल अशा कुटूंबासाठी बक्षीस जाहीर केले आहे.

गावात मुलगा जन्म न घेण्याचे कारण कोणालाही माहिती नाही, परंतु लोक असे म्हणतात की येथे बर्‍याच काळापासून लिंग गुणोत्तरात फरक आहे. मुली जास्त आणि मुले कमी. गावात सुमारे 300 लोक राहतात, ज्यात सर्वाधिक महिला आणि मुलींचा समावेश आहे.

नोंदणीकृत जन्म प्रमाणपत्रे आणि ऐतिहासिक नोंदी तपासल्यानंतर, महापौर रेजमंड फ्रिशको यांनी देखील पुष्टी केली की येथील मुलांचा जन्म खरोखरच एक अनोखी घटना आहे. महापौरांच्या या ऑफरच्या घोषणेनंतर वॉर्सा विद्यापीठानेही येथे असे का आहे याचा शोध सुरू केला आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख तोमाज गोलज म्हणतात, मला स्वतःच माझ्या घरात मुलगा असावा असे वाटते, परंतु या गावाचा इतिहास पाहता असे दिसते की येथे मुलगा होण्याची शक्यता फारच कमी आहे. याचा अर्थ असा नाही की मी मुलींच्या विरोधात आहे, परंतु मला स्वत:च्या दोन मुली आहेत आणि माझी पत्नी देखील याच गावाची आहे. मला माझे कुटुंब पूर्ण करण्यासाठी मुलाची गरज आहे.

वारसाच्या मेडिकल युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर रफाल प्लॉस्की यांच्या म्हणण्यानुसार गावात मुले जन्माला आली नाहीत तर ही चिंताजनक बाब आहे. हे गूढ निराकरण करणे सोपे नाही. यासाठी जुन्या नोंदी तपासल्या पाहिजेत. तसेच, मुलींच्या पालकांचे दूरचे नातेवाईक आहेत की नाहीत, हेही पहावे लागेल. याशिवाय पर्यावरणाची स्थितीही पहावी लागेल. तरच हे प्रकरण मिटू शकेल.

Leave a Comment