ओवेसी यांना पुन्हा हवी आहे त्यांची मशीद


हैदराबाद: सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने अयोध्या जमीन वादावर ऐतिहासिक निकाल देत रामजन्मभूमी न्यासाला अयोध्येतील वादग्रस्त जमीन देण्याचा व अन्यत्र ५ एकर जागा मशिदीसाठी देण्याचा आदेश दिला असताना त्यावर पुन्हा एकदा एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे.

आज एक ट्विट करून मला माझी मशीद पुन्हा हवी असल्याची अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या खटल्यावर निकाल दिला, ओवेसी यांनी तेव्हाही आपला आक्षेप नोंदवला होता. मीसुद्धा या निकालाशी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाप्रमाणेच सहमत नाही. सर्वोच्च न्यायालय ‘सर्वोच्च’ असले तरी न्यायालयाकडूनही चूक होऊ शकते, असे ओवेसी यांनी म्हटले होते. बाबरी मशीद ज्यांनी पाडली त्यांनाच ट्रस्ट बनवायला सांगून राम मंदिर उभारायला सांगण्यात आले असल्याचे नमूद करत जर आज मशीद उभी असती तर सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला असता?, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला होता.

भारताच्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या हक्काची लढाई आम्ही लढत होतो. ५ एकर जमिनीचे दान आम्हाला कुणी देण्याची गरज नाही. मुसलमान गरीब असला तरी मशिदीसाठी जमीन घेण्यास व पैसा उभा करण्यास तो सक्षम असल्याचेही ओवेसी म्हणाले होते. हिंदूराष्ट्राच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली आहे. अयोध्येतून याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. हिंदूराष्ट्राची संकल्पना एनआरसी आणि सिटिझन बिल या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याच्या हालचाली पडद्यामागून सुरू असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला होता. त्यात आता ओवेसी यांच्या ताज्या ट्विटनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.