महाशिवआघाडीच्या नेत्यांनी मागितली राज्यपालांची वेळ


मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या (महाशिवआघाडी) नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती असल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आता ‘महाशिवआघाडी’ सत्तास्थापनेचा दावा करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागितल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांकडून राजभवनावर नेमके कोणते नेते जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तिन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या भेटीत सत्तास्थापनेचा दावा करणार की अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबत मागणी करणार, हे समजलेले नाही. आजच सकाळी याबाबत भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

दरम्यान, महाशिवआघाडीच्या पहिल्या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काल तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची पहिली समन्वय बैठक पार पडली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान सामायिक कार्यक्रमाचा मसुदा तयार केल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे. शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद हे असेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वारंवार सांगितले आहे. पण अन्य मंत्रिपदांची वाटणी कशी करायची याबाबत समन्वय बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही पक्षांनी 14-14-12 असे मंत्रिपदाचे सूत्र ठरवले आहे. सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रिपदेही मिळतील.

प्रत्येक पक्षाला महत्वाची चार खाती वाटून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यानुसार गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पक्षाला नगरविकास, जलसंपदा, MSRDC दिले जाण्याची चिन्ह आहेत. तर ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात.

Leave a Comment