संजय राऊत यांना मोदी, शहांना समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील


मुंबई – शुक्रवारी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका करणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. त्याचबरोबर आजच संजय राऊत यांचा शुक्रवारी वाढदिवस असताना आशिष शेलार यांनी त्यांना वयासोबत आपली परिपक्वताही वाढावी, असाही टोमणा लगावला.

आशिष शेलार म्हणाले, रोज सकाळी एका नेत्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा एकपात्री प्रयोग केला जातो आहे. पण या नेत्याचे हेतू सफल होणार नाहीत. संजय राऊतांना अमित शहा आणि नरेंद्र मोदींना समजून घ्यायला अनेक जन्म घ्यावे लागतील. जरा विचार करून त्यांनी वक्तव्य करावीत, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

सध्या तीन पक्षांचा सत्तेसाठी जो ड्रामा सुरू आहे. आम्ही तो बघत आहोत. सगळे जण पूर्वी ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात होते. पण आता सत्तालालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलात गाठीभेटी होत आहेत. त्यांचे जे काही सुरू आहे ते आम्ही बघत आहोत, असेही सूचकपणे आशिष शेलार यांनी सांगितले.

Leave a Comment