‘बीसीसीआय’ची राहुल द्रविडला क्लीन चीट


मुंबई : टीम इंडियामध्ये द वॉल म्हणून प्रसिद्ध असणारा माजी कर्णधार राहुल द्रविडला हितसंबंधांच्या मुद्यावरुन बीसीसीआयने नोटीस बजावली होती. अखेर द्रविडला या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. द्रविडला क्लीन चीट बीसीसीआयचे अधिकारी न्यायमूर्ती (निवृत्त) डी. के. जैन यांनी दिली. न्यायमूर्ती जैन यांच्यानुसार, माजी भारतीय कर्णधाराविरोधातील आरोपांमध्ये त्यांना कुठलेही तथ्य आढळले नाही. 12 नोव्हेंबरला जैन यांच्यासमोर द्रविडची हजेरी होती. त्यानंतर जैन यांनी हा निर्णय सुनावला.

बीसीसीआयने हितसंबंधांच्या मुद्यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचा (एनसीए) क्रिकेट संचलन प्रमुख राहुल द्रविडला नोटीस बजावली होती. बीसीसीआयचे अधिकारी (निवृत्त) जस्टीस डी. के. जैन यांनी ही नोटीस मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीवरुन पाठवली होती.

राहुल द्रविड एनसीएचा संचलन प्रमुख असून इंडिया सिमेंट ग्रुपचाही उपाध्यक्ष आहे. इंडिया सिमेंटकडे आयपीएल फ्रँचायजी चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकार आहेत. द्रविड दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असल्याने हितसंबंधाच्या मुद्याचं हे उल्लंघन आहे, असा आरोप गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत केला होता. मात्र, आता या प्रकरणी राहुल द्रविडला क्लीन चीट देण्यात आली आहे.

Leave a Comment