एका पेक्षा जास्त बँकेत खाती असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी


(Source)
नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेक जणांची एकापेक्षा जास्त बँकेत खाती असतात. पण तुम्ही जर त्यातील कोणत्याही बँकेचे खाते वापरत नसला तर ते त्वरित बंद करा. कारण खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला खात्यावर किमान रक्कम ठेवणे गरजेचे असते. तुम्ही जर असे केले नाही तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. खातं बंद करण्यासाठी त्याच्याशी संबंधित सर्व डॉक्युमेंट डी-लिंक करावी लागतात. कारण गुंतवणूक, कर्ज, ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि विमा यांना बँक खाते जोडलेले असते.

आपल्यापैकी अनेकजण कालांतराने आपली नोकरी बदलत असतात. पण प्रत्यके प्रत्येक ठिकाणी सॅलरीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मागणीनुसार बँक खात्याची माहिती द्यावी लागते. त्यामुळे आपले आधीच्या बँक खात्यावर व्यवहार कमी होतात. तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही सॅलरी खात्यावर पगार आला नाही तर त्या खात्याचे बचत खात्यात रुपांतर होते. त्यानंतर खात्यावर किमान रक्कम ठेवावी लागते. तुम्ही जर रक्कम ठेवली नाहीत तर तुमच्याकडून दंड आकारला जातो आणि तो दंड थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जातो.

अनेक बँकांमध्ये खाते असल्यामुळे आयकर भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक खात्याची माहिती तुम्हाला द्यावी लागते. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या खात्यांचे स्टेटमेंटसुद्दा द्यावे लागते. एखाद्या खात्यावर व्यवहार न केल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

वापरात नसलेले खाते बंद करण्यासाठी अकाउंट क्लोजर फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म बँकेच्या शाखेत मिळतो. तुम्हाला खाते बंद करण्याचे कारण फॉर्मवर विचारले जाते. त्यानंतर आणखी एक फॉर्म भरावा लागतो ज्यामध्ये तुम्हाला अशा खात्याची माहिती द्यावी लागते ज्यावर बंद होणाऱ्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करता येतील. बँकेत खाते उघडल्यापासून 14 दिवसांच्या आत बंद करण्यासाठी कोणतीही आकारणी केली जात नाही. पण त्यानंतर एक वर्षापर्यंत खाते बंद करण्यासाठी पैसे आकारले जातात. एक वर्षापेक्षा जुने खाते असेल तर त्यावर पैसे आकारले जात नाहीत.

खाते बंद करण्यापूर्वी तुमच्याकडे न वापरलेलं चेकबुक आणि डेबिट कार्ड असेल तर ते बँकेत जमा करावे लागते. तसेच खात्यावर पैसे असतील तर ते दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले जातात. जास्त पैसे असतील तर खाते बंद करण्याची प्रोसेस सुरु करण्याआधी ते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा आणि त्याचे स्टेटमेंट तुमच्याकडे ठेवा.

Leave a Comment