प्रदुषणाबाबत गंभीर नसलेल्या गौतमचा जिलेबीवर ताव, ‘आप’ने केली टिका

भाजपचे खासदार गौतम गंभीर प्रदुषणासंबंधित उच्च-स्तरीय बैठकीत गैरहजर राहिल्याने आम आदमी पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याआधी गंभीर यांनी दिल्लीतील प्रदुषणावरून भारत-बांगलादेश सामन्याबद्दल वक्तव्य केले होते. मात्र स्वतः गंभीरच प्रदुषणासंबंधित उच्च स्तरीय बैठकीत अनुपस्थित राहिल्याने आपने जोरदार टीका केली आहे.

प्रदुषणासंबंधित संसदीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व दिल्लीतील एक मात्र खासदार गौतम गंभीर यांना यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र या बैठकीला न जाता गंभीर मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे सुरू असलेल्या भारत-बांगलादेशमधील कसोटी सामन्यात व्हीव्हीएस आणि इतरांबरोबर जिलेबी खाताना दिसून आले.

आपने गौतम गंभीर यांचे जिलेबी खातानाचे फोटो ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला.

आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील ट्विट करत गंभीर यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, ही बैठक 8 दिवस आधीच निश्चित करण्यात आली होती. गौतम गंभीर केवळ ट्विटवर ज्ञान देत आहेत, मात्र बैठकीला येऊ शकत नाहीत.

नेटकऱ्यांनी देखील बैठकीला उपस्थित न राहिल्याने गंभीर यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे या बैठकीला बोलवण्यात आलेल्या 29 मंत्री-अधिकाऱ्यांपैकी केवळ 4 जणच उपस्थित होते.

Leave a Comment