कन्फर्म : ‘पृथ्वीराज चौहान’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार मानुषी छिल्लर


भारताच्या शिरपेचात ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकूट जिंकून मानुषी छिल्लरने आणखी एक तुरा रोवला. त्यानंतर तिच्या बॉलीवूड पदार्पणाच्या अनेको बातम्या आल्या होत्या, पण मानुषीने त्यावर कधीही भाष्य केले नव्हते. पण आता लवकरच अभिनेता अक्षय कुमारसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

अक्षय कुमारसोबत मानुषी पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या ऐतिहासिक बायोपिकचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. हा चित्रपट मानुषीने साइन केला असून ती यात ‘संयोगिता ’ची भूमिका साकारणार आहे. यशराज प्रोडक्शनअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांच्या प्रेमकथेतील काही पैलू उलगडण्यात येणार आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना मानुषी म्हणाली की, यशराज फिल्म्स सारख्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याची संधी मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. कलाविश्वातील यशराज हे मोठे नाव असून त्यांच्यासोबत काम करण्याची कोणाची इच्छा नसेल? राजकुमारी संयोगिता यांची भूमिका साकारणे एक मोठी जबाबदारी आहे. कोणतीही ऐतिहासिक भूमिका करणे ही जबाबदारीची गोष्ट असल्यामुळेच भूमिकेला न्याय देण्यासाठी मी प्रचंड मेहनत करत आहे.

Leave a Comment