‘तानाजी’मध्ये ‘हे’ कलाकार साकारणार शिवाजी महाराज आणि जिजाऊंची भूमिका


छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक मावळ्यांना आपले बलिदान केले आहे. या मावळ्यांच्या कर्तृत्वाची दखल शिवकालीन इतिहासांच्या पानांवर सुवर्ण अक्षरात घेण्यात आलेली आहे. तानाजी मालुसरे देखील या मावळ्यांमधील एक महान योद्धाचे नाव असून या महान योध्दयाच्या पराक्रमाची गाथा आता मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे, तर आता चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंची भूमिका कोण साकारणार आहे हे स्पष्ट झाले आहे. नुकताच या चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


ट्विटवरुन एक ट्विट करत तानाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणनेच शिवाजी महाराजांचे पोस्टर शेअर केले आहे. अजयने शिवाजी महाराजांचा चित्रपटातील लूक ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ ट्विट करत प्रसिद्ध केला आहे. या पोस्टरमध्ये डोक्यावर जीरेटोप, टोकदार दाढी, गळ्यात मोत्यांची माळ अशा राजेशाही थाटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक दिसत आहे. तसेच या पोस्टरमध्ये घोड्यावर स्वार झालेले महाराज दाखवण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा साकारत आहे.


शिवाजी महाराजांबरोबरच राजमाता जिजाऊंच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. जिजाऊंच्या भूमिकेमध्ये पद्मवती राव या दिसणार आहेत. ओम राऊतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. सैफच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वीच अजयचा तानाजी यांच्या भूमिकेतील लूक रिलीज करण्यात आला होता. सैफ आणि अजयही १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. १० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment