कसोटी मालिका, पहिल्या दिवसाखेर भारतच्या एक बाद 86 धावा


नवी दिल्ली – इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत-बांग्लादेश यांच्यातील सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. पण कर्णधार मोमिनुल हक याचा निर्णय चुकीचा ठरला आणि बांग्लादेश संघ 150 धावांवर ऑल आऊट झाला. यानंतर भारतीय संघ फलंदाजी करत पहिल्या दिवसाखेर 1 बाद 86 धावा केल्या. भारतीय संघ बांगलादेशपासून सध्या 64 धावा मागे आहे. सुरुवातीपासूनच टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व कायम ठेवले होते.

बांग्लादेशला 150 धावांवर ऑल आऊट केल्यानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दोंघांमध्ये 14 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, रोहित अबू जाएद याच्या चेंडूवर विकेटच्या मागे लिटन दास याच्या हाती झेल बाद झाला. रोहितने 6 धावा केल्या. यानंतर मयंकने चेतेश्वर पुजारा याच्या साथीने डाव सावरला आणि सावध खेळ करत चौकार लागवण्याचे सत्र सुरु ठेवले. मयंक आणि पुजाराने वेगाने धावा केल्या. खेळ संपला तेव्हा मयंक 37 आणि पुजारा 43 धावांवर खेळत होते.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इम्रुल कयास आणि शादमन इस्लाम यांनी बांग्लादेशच्या डावाची सुरुवात केली. बांगलादेशसाठी मुशफिकुर रहीम आणि मोमीनुल हक यांनी सर्वाधिक धावा केल्या. रहीम 43 आणि मोमीनुल 37 धावांवर बाद झाले. दुसरीकडे, मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. अश्विनने विरोधी संघाचा कर्णधार मोमिनुलला बोल्ड केले आणि घरच्या मैदानावर खेळताना 250 टेस्ट विकेट घेण्याचा पराक्रम केला.

Leave a Comment