एका रुपयाचे महागडे नाणे


१९३९ चे, इंग्लंड चे राजे सहावे जॉर्ज यांचा छाप असलेले एक रुपयाचे नाणे, हे नाणे चांदीचे असून, डिसेंबर २०१५ साली झालेल्या निलामी मध्ये सगळ्यात मूल्यवान, म्हणजेच तब्बल सहा लाख रुपये किमतीचे ठरले आहे. हे नाणे इतके मूल्यवान कसे ठरले ह्या मागचा इतिहास मोठा रोचक आहे. १९३९ साली चलनात आलेले हे नाणे फार दुर्मिळ आहे.

१९१४ साली जेव्हा युरोप मध्ये प्रथम विश्वयुद्ध झाले तेव्हा सोने आणि चांदी खूपच महागले. त्यामुळे त्या काळी चलनात असलेली सर्व चांदीची नाणी चलनातून काढून टाकण्यात आली. त्या ऐवजी १९१७ साली ब्रिटीश सरकारने एक रुपया आणि अडीच रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. कालांतराने, म्हणजे साधारण १९२२ सालच्या वेळी चांदीचा भाव कमी झाल्यानंतर ब्रिटीश सरकारने पुनश्च २५ पैसे आणि ५० पैशांची नाणी चलनात आणली. पण एक रुपयाचे नाणे मात्र पुष्कळ काळापर्यंत चलनात आले नाही. १९३८-३९ या काळामध्ये इंग्लंडचे राजे सहावे जॉर्ज यांच्या नावाने एक रुपयाची नाणी चलनात आणली गेली. तेव्हा त्यांच्या थोरल्या भावाने राजगादीवरील आपला हक्क सोडल्याने सहावे जॉर्ज इंग्लंड चे राजे बनले होते. त्या प्रीत्यर्थ सहावे जॉर्ज यांचा छाप असलेले हे नाणे चलनात आणले गेले. हे एक रुपयाचे नाणे जेव्हा चलनात आले त्यानंतर लगेचच दुसरे महायुध्द सुरु झाले, आणि चलनात असलेली सर्व चांदीची नाणी परत चलनातून मागे घेण्यात आली. त्या काळी चांदीचा भाव इतका महागला की लोकांनी चांदी मिळविण्याकरिता चक्क नाणीच वितळवून घ्यायला सुरुवात केली.

महागलेल्या चांदीमुळे नंतर फक्त ५० टक्के चांदी आणि बाकी मिश्र धातूंनी बनविलेली नाणी चलनात आली. तत्पूर्वी बनत बसलेल्या चांदीच्या नाण्यामध्ये ९७ टक्के शुद्ध चांदी असे. त्यामुळे सहावे जॉर्ज यांचा छापा असलेली ती नाणी सर्वात अखेरची शुद्ध चांदीने बनलेली नाणी ठरली आणि म्हणूनच इतकी मूल्यवान ठरली. त्याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही नाणी अगदी थोड्याच संख्येत आता अस्तित्वात आहेत. आणि जी काही आहेत ती देखील खासगी संग्रहामध्ये असून आम जनतेस पाहण्यासाठी खुली नाहीत.

Leave a Comment