भाजपला देणगी रुपात मिळाले एवढे कोटी रुपये


मुंबई : यावर्षी म्हणजेच 2018-19 मध्ये एकूण 800 कोटी रुपयांची देणगी भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे. भाजपने 31 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यंदा चेक आणि ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून भाजपला एकूण 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली आहे. तर काँग्रेसला फक्त 146 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

टाटा समूहद्वारे भाजपला सर्वाधिक देणगी मिळाली असून ती 356 कोटी रुपये एवढी आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपने जमा केलेल्या कागदपत्रानुसार भाजपला भारतातील सर्वाधिक कमाई करणारी संस्था द प्रुडेंट ट्रस्टने 67 कोटी रुपयांची देणगी दिली. तर काँग्रेसला याच संस्थेने 39 कोटी रुपयांची देणगी दिली. या ट्रस्टमध्ये भारती ग्रुप, हीरो मोटोकॉर्प, जुबिलियेंट फूडवर्क्स, ओरिएंट सीमेंट, डीएलएफ, जेके टायर्स यासारख्या कंपन्यांनी आपला वाटा दिला आहे.

एकूण 146 कोटी रुपयांची देणगी काँग्रेसला मिळाली आहे. यामध्ये 98 कोटी रुपये अशाच ट्रस्टकडून काँग्रेसला मिळाले आहे. भाजपला एकूण 800 कोटी रुपयांमधील 470 कोटी रुपये विविध संस्थांकडून मिळाले आहेत. आदित्य बिर्ला समुहाकडून भाजपला 28 आणि काँग्रेसला 2 कोटी रुपये देणगी देण्यात आली आहे. तसेच भाजपला ट्रिम्प संस्थेने 5 कोटी, हार्मोनी ग्रुपने 10 कोटी, जनहित संस्थेने आणि न्यू डेमोक्रेटिक संस्थेने भाजपला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये देणगी दिली.

दरम्यान, एखाद्या राजकीय पक्षाला 20हजारपेक्षा अधिक देणगी मिळाली तर निवडणूक आयोगाला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, भाजपला व्यक्ती, कंपनी आणि निवडणूक संस्थेद्वारेही देणग्या मिळाल्या आहेत.

Leave a Comment