बूटांची दुर्गंधी घालवा…


कामानिमित्त किंवा दिवसभर ऑफिसमध्ये बूट घालून फिराव्या लागणाऱ्या व्यक्तींनी बूट काढले की तळपायाला वास येण्याचा अनुभव घेतला असेलच. तो टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अगदी परफ्यूमही वापरला जातो. पण तरीही ही दुर्गंधी जात नाही. त्यामुळे अर्थातच आपल्याला खूप लाज वाटते.

पायांना येणाऱ्या या दुर्गंधीला ब्रोमिहाईड्रोसिस या नावानेही ओळखले जाते. मुळातच हा प्रश्‍न उद्भवतो तो पायाला येणारा घाम न सुकल्यामुळे. सर्वांच्याच शरीरावर जीवाणू असतातच पण काही व्यक्तींचा पायाचा घाम न सुकल्याने तो या जीवाणूंच्या संपर्कात येतो आणि पायाला घाण वास येऊ लागतो. वास्तविक, काही घरगुती उपायांनी पायांची येणारी दुर्गंधी कमी करता येऊ शकते.

असे उपाय करा
पाय स्वच्छ ठेवा – बूट घालण्यापुर्वी पाय स्वच्छ आहेत ना याची खात्री करा आणि काळजी घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायांची स्वच्छता राखा. कारण पाय घाण असतील आणि तसेच बूट घातल्यास पायाला जास्त दुर्गंधी येते. त्यामुळे या सर्व उपायांसह पायांची स्वच्छता करण्यास प्राधान्य द्या

बेकिंग सोडा – सोडियम कार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा हा या दुर्गंधी घालवण्यासाठी वापरता येईल. पायाला येणारा वास दूर करण्यासाठी हा खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्यामुळे घामाची पातळी नियंत्रित होते आणि जीवाणूंना रोखण्यास मदत होते. कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिसळावा. या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. काही आठवडे हा उपाय केल्याने फायदा होतो.

लव्हेंडर तेल – लव्हेंडर तेलाचा सुगंध चांगला असतोच पण जीवाणूंचा प्रतिबंध करण्यासाठीही ते फायदेशीर आहे. या तेलामध्ये जीवाणुविरोधी गुणधर्म आहेत त्यामुळे पायांची दुर्गंधी कमी होण्यास फायदा होतो. कोमट पाण्यात काही थेंब लव्हेंडर तेलाचे टाकून पाय थोडावेळ बुडवून ठेवावेत. दिवसातून दोन वेळा असे केल्यास फायदा होईल.

तुरटी – तुरटीमध्ये जीवाणूरोधक गुण असतात. तुरटीमुळे जीवाणूंची वाढ थांबते. एक चमचा तुरटी पावडर पाण्यात टाकून त्या पाण्याने पाय धुवावेत. काही दिवस असे केल्याने दुर्गंधीची समस्या दूर होईल.

खडे मीठ – खडे मीठामुळे पायाला दुर्गंध येण्याची समस्या दूर होऊ शकते. तळपायाला येणाऱ्या घामामुळे होणारा संसर्ग आणि जीवाणू दूर करण्यात मदत होते. याचा वापरही तुरटीसारखा करावा.

आले आणि व्हिनेगर – पाण्यात व्हिनेगर घालून त्याने पाय धुवू शकता. किंवा आल्याचा रस काढून तो तळपायांना चोळावा काही वेळाने कोमट पाण्याने धुवून टाकावे असे केल्याने पायाचा वास निघून जातो.

Leave a Comment