राजस्थान येथील सेल्फ हेल्प ग्रुप मुळे महिला बनल्या स्वावलंबी..


राजस्थान मधील फागी जिल्ह्यातील हथेली गावातील महिला रजई बनविण्यात निपुण. घरोघरी महिलांचे हेच काम. या त्यांच्या कलेचा उपयोग उदरनिर्वाहासाठी करीत हथेली गावाच्या महिलांनी श्याम आणि महाराणी या नावांचे सेल्फ हेल्प ग्रुप स्थापित केले आहेत. या दोन्ही ग्रुप द्वारे महिलांना रजई बनविण्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला जातो. या ग्रुप च्या महिलांद्वारे तयार केल्या गेलेल्या रजयांना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. रजई ची गरज फक्त थंडीपुरतीच भासत असली तरी बाजारामध्ये या रजयांना भरपूर मागणी असल्यामुळे त्या बनविणाऱ्या महिलांना वर्षभर काम मिळून त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालतो. या रजयांसाठी लागणारा कच्चा माल, म्हणजेच कापूस, कपडा, रजई शिवण्यासाठी लागणारा दोरा इत्यादी सर्व सामानाची खरेदी जोधपुर हून केली जाते.

हा घरगुती व्यवसाय सुरु होण्याआधी या महिला मोलमजुरी करीत असत. कधी काम मिळत असे तर कधी नाही, त्यामुळे घरामध्ये नियमित पैशांची आवक होत नसे. पण आता रजई बनविण्याच्या या नवीन व्यवसायामुळे महिलांना नियमित पैसे मिळायला लागून त्या स्वावलंबी तर बनल्या आहेतच, शिवाय आपण काही तरी करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास ही त्यांच्यात आता निर्माण झाला आहे. गेली सहा सात वर्ष हा व्यवसाय करणाऱ्या या महिला आता या कामामध्ये अगदी निपुण झाल्या आहेत..एक रजई बनविण्यास एका महिलेस साधारणपणे तीन ते चार दिवस लागतात. एकमेकींनी तयार केलेल्या रजयांचे नमुने बघत बघत नवनवीन पद्धतीने रजया बनवायला या महिला आता शिकल्या आहेत. कुठल्या ही प्रकारचे ट्रेनिंग न घेतलेल्या या महिला रजयांच्या कपड्यावर ब्लॉक प्रिंटींग, किंवा खड्यांची कलाकुसर अगदी लीलया करू शकतात.

या व्यवसायामुळे या महिलांच्या गाठीशी चार पैसे राहू लागले आहेत. या पैशांचा उपयोग त्या महिला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करीत आहेत. आता पैशासाठी त्यांना कोणाच्या ही समोर हात पसरवावा लागत नसल्याचे समाधान त्या महिलांना आहे. आधी साध्या बांगड्या विकत घ्यायच्या तरी पतीकडे पैसे मागावे लागत असत. पण आता या छोट्या मोठ्या गरजा त्या स्वतःहून भागवू शकतातच, शिवाय अडी अडचणीच्या वेळेसाठी देखील पैसे शिल्लक टाकतात.

Leave a Comment