फेसबुकच्या ‘या’ बगला वैतागले आयफोन युझर्स


नवी दिल्ली : पुन्हा एकदा फेसबुकवर युझर्सची सुरक्षा आणि गोपनीयतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जगभरातील आयफोन युझर्स फेसबुक न्यूज फीडमध्ये स्क्रोल करत असताना बॅकग्राऊंडमध्ये कॅमेरा आपोआप सुरु होत असल्याची तक्रार करत आहेत. अनेक युझर्स कॅमेरा आपोआप का सुरु होत आहे याबाबत विचार करत असतानाच हे फेसबुकमुळे होत असल्याचे समोर आले.

या बगच्या बाबत तक्रार करत जोशुआ मॅडक्स नावाच्या एका आयफोन युझरने ट्विट केले. या युझरने फेसबुकचा वापर करत असताना अत्यंत मोठ्या प्रमाणात कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे, अशी तक्रार केली. फेसबुकच्या अॅपमध्ये हा बग आढळला असून न्यूज फीड स्क्रोल करताना कॅमेरा आपोआप होत असल्याचा दावा मॅडक्सने केला.

एका बगमुळे युझर्सला त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे फेसबुकनेही मान्य केले असून यावर कंपनीच्या इंटीग्रिटीचे उपाध्यक्ष गाय रॉजन यांनी भाष्य केले. हा एक बग असल्याचे दिसत असून कंपनी यावर काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गाय रॉजन यांनी युझर्सचे या बगकडे लक्ष वेधल्याबद्दल आभारही मानले.

या दिग्गज कंपनीला आपल्या अॅप मध्ये बग असल्याचे काही वेळातच मान्य करावे लागले. या बगचा त्रास iOS १३ वापरत असलेल्या युझर्सनाच होत असल्याचेही रॉजन म्हणाले. आयफोन फेसबुक अॅप अचानक लँडस्केपमध्ये लाँच होत असल्याचे आढळून आले आहे. हा बग गेल्या आठवड्यात फिक्स करत असतानाच चुकून दुसराच एक बग समोर आल्यामुळे फोटोवर क्लिक केल्यानंतर थेट अॅप आणि कॅमेरा स्क्रीनचा संबंध येतो. या बगमुळे कोणताही फोटो किंवा व्हिडीओ आपोआप अपलोड झाल्याचे अजून कोणतेही पुरावे कंपनीला मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

Leave a Comment