फेसबुक अकाऊंट डिलीट करा, व्हॉट्सअ‍ॅपच्या सह-संस्थापकाचे युजर्सला आवाहन

फेसबुकची गोपनियता आणि एन्क्रिप्शनवर नाराजी व्यक्त केलेले कॉम्प्युटर प्रोग्रामार आणि व्हॉट्सअ‍ॅपचे सह-संस्थापक ब्रायन एक्टन यांनी पुन्हा एकदा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यापेक्षा वेगळे मत मांडले आहे. त्यांनी पुन्हा एकदा युजर्सला फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे आवाहन केले आहे.

सॅन फ्रांसिस्को येथे आयोजित एका कार्यक्रमात ब्रायन एक्टन बोलत होते. ते म्हणाले की, जर युजर्सला फक्त जाहिरातीच बघायच्या असतील तर ते आनंदाने फेसबुक वापरू शकतात.

मागील काही दिवसांपासून युजरच्या प्रायव्हेसीबद्दल फेसबुकवर जोरदार टीका होत आहे. याआधी देखील ब्रायनने स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे आवाहन केले होते. फेसबुकशी असलेले मतभेद त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केले होते.

फेसबुकला आपली कंपनी विकल्याबद्दल ब्रायन म्हणाले होते की, अखेर मी स्वतःची कंपनी विकली. स्वतःच्या युजर्सचीच प्रायव्हेसी विकली. या चुकीसोबत मी दररोज जगत आहे.

ब्रायन एक्टनने जॅन कोमसोबत मिळून व्हॉट्सअ‍ॅपची सुरूवात केली होती. मात्र 2014 मध्ये 22 अब्ज डॉलरमध्ये फेसबुकला कंपनी विकण्यात आली.

 

Leave a Comment