भाजपला फक्त खुर्चीची हाव, राज्याचे त्यांना काही घेणे-देणे नाही


पुणे – लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा भगवा करू, अशी भाषा नेते करत होते. पण शिवसेनेला प्रत्यक्षात जिल्ह्य़ातून एकही जागा निवडून आणता आली नाही, शिवसेना नेत्यांनी याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्ला शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांना उद्देशून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. शिरूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या आमदारांचा आंबेगाव-शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अशोक पवार, अतुल बेनके, चेतन तुपे यांचा मंचर येथे झालेल्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, शरद पवार यांचा करिष्मा या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मैदानात पवार साहेब उतरल्याने झंझावात निर्माण झाला. राष्ट्रवादीचे पाच आमदार शिरूर लोकसभेत निवडून आले, लोकसभा निवडणुकीतच त्याची रंगीत तालीम झाली होती. खासदारपदी आपण निवडून येण्यात या पाचही आमदारांचे श्रेय मोठे होते. भाजपकडून अनेक वल्गना प्रचारादरम्यान करण्यात आल्या. त्यांना १०५ जागांवरच जनतेने थांबवून योग्य तो संदेश दिला. भाजपला फक्त खुर्चीची हाव असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या, महाराष्ट्रातील प्रश्न दिसत नसल्याची टीका कोल्हे यांनी केली. शिरूर लोकसभेचे प्रलंबित प्रश्न पाचही आमदारांच्या सहकार्याने मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Comment