बीयरमुळे कल्पकतेला चालना


रसायन शास्त्राचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अल्कोहोल विषयी माहिती देताना अल्कोहोलचा मेंदूवर काय परिणाम होतो हे शिकवलेले असते. अल्कोहोलमुळे कल्पनाशक्ती तरल होते असे वर्षानुवर्षे मानले गेलेले आहे. नवनिर्मिती करणारे कलाकार आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर अफाट लेखन करणारे लेखक, कवी यांच्यापैकी बर्‍याच जणांना मद्यपानाचे व्यसन असतेच. महाराष्ट्रात भरपूर मद्य प्राशन करणार्‍या आणि उत्तम भाषण आणि लेखन करणार्‍या अनेक साहित्यिकांच्या आणि वक्त्यांच्या कथा आपण वर्षानुवर्षे ऐकत आहोत. या लेखकांना आणि वक्त्यांना आपण व्यसनी ठरवत असलो तरी त्यांच्या कल्पनाशक्तीला त्यांच्या मद्यामुळे चालना मिळालेली असते हे नाकारता येत नाही. अशा कलाकारांचे काही चाहते त्यांच्या व्यसनाकडे दुर्लक्ष करतात आणि कलाकार म्हटले की एखादे व्यसन असणारच असे समर्थनही करतात.

अल्कोहोलचा म्हणजेच मद्याचा मेंदूवर खरोखरच काय परिणाम होतो याच्यावर तुलनात्मक अभ्यास मात्र फारसा झालेला नाही. ऑस्ट्रिया युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅझ या विद्यापीठामध्ये मात्र संशोधकांनी मद्याच्या मेंदूवरील प्रभावावर खरोखरच संशोधन केलेले आहे. मद्यप्राशन करणार्‍या व्यक्तीची निर्मिती क्षमताही वाढते आणि कलाकार म्हणून हटके विचार करण्याची क्षमताही बळावते असे या विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले आहे. त्यांनी मद्यप्राशन केलेले लोक आणि न केलेले लोक यांच्या निर्मिती क्षमतेचा आणि कल्पकतेचा तुलनात्मक अभ्यासच केला. तेव्हा त्यांना हे निष्कर्ष हाती आले.

अर्थात, असे असले तरी मद्यप्राशनाचे फार समर्थन ते करत नाहीत. त्यांच्या मते कल्पकतेला चालना देण्यासाठी रम किंवा ब्रँडीसारखे महागडे मद्य आवश्यक नाही. त्यासाठी बीयर पुरेशी आहे आणि ही बीयरसुध्दा जास्त नाही तर एक पिंट किंवा महिलांसाठी साडेतीनशे मिलीलीटर एवढी पुरेशी आहे. एवढ्या मद्य प्राशनाने ते प्राशन करणार्‍यांच्या कल्पकतेमध्ये ४० टक्के वाढ होते असे त्यांना आढळले आहे. हे संशोधन करताना त्यांनी मद्य प्राशन केलेल्या आणि न केलेल्या लोकांना काही शब्दांच्या चाचण्या दिल्या आणि एक शब्द देऊन त्याचे काही प्रतिशब्द दिले. ते सगळे प्रतिशब्द समानार्थी नव्हते. परंतु त्यातला कोणता प्रतिशब्द मूळ शब्दाच्या जवळ जाणारा आहे हे सांगायचे होते. त्यात बीयर पिणारे पास झाले. अशी कल्पनाशक्ती वाढत असली तरी बीयर पिणार्‍यांची व्यवस्थापन क्षमता मात्र मारली जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment