जयपुरमधील ज्या हॉटेलमध्ये काँग्रेस आमदार मुक्कामी आहेत, त्याचे दिवसाचे आहे एवढे भाडे


मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यातच आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील एका आलिशान ह़ॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, दुसरीकडे या बाबतीत काँग्रेसही मागे राहिले नाही. आपल्या पक्षातील आमदारांसोबत फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी काँग्रेसने आमदारांना काँग्रेस शासित राज्यात अर्थात राजस्थानमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पटलावरचे पेच सुटत नसले तरीही अनेकांचे त्या दिशेने होणाऱ्या हालचाली मात्र लक्ष वेधत आहेत. आपल्या आमदारांना या साऱ्यापासून दूर ठेवत त्यांना एक आकर्षक सुविधांनी परिपूर्ण अशा बुएना व्हिस्टा रिसोर्ट्समध्ये काँग्रेसने ठेवले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले असून त्यांच्या वृत्तानुसार बुएना व्हिस्टा रिसोर्ट्स या शांततापूर्ण वातावरणातील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये काँग्रेसने आमदारांना ठेवले आहे. हा रिसॉर्ट जयपूर-दिल्ली महामार्गापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे.

बऱ्याच अत्याधुनिक आणि लक्षवेधी सोयी बुएना व्हिस्टा रिसोर्ट्समध्ये आहेत. ५० खासगी व्हिला येथे असून ज्यामध्ये प्रत्येक व्हिलाला एज स्विमिंग पूल देण्यात आले आहे. त्याशिवाय दोन रेस्टॉरंट, दोन बार आणि स्पा, जिथे पाहुणेमंडळी निवांत बसू शकतात अशा सुविधा देखील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एका फ्रेंच राजकीय नेत्याकडे या रिसॉर्टची मालकी आहे. परिणामी येथील निर्मिती आणि सजावटीमध्ये भारतीय, विशेषत: राजस्थानी आणि फ्रेंच संस्कृती आणि कलाकुसरीचे परिणाम पाहायला मिळतात.

बुएना व्हिस्टा रिसोर्ट्सच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यास येथेही काही आकर्षक गोष्टी लक्ष वेधतात. खासगी स्विमिंग पूल असणारा गार्डन व्हिला, बेस कॅटेगरी व्हिला (किंमत- एक दिवस २४ हजार रुपये – १८ टक्के कर वगळून), खासगी स्विमिंग पूलसह हेरिटेज व्हिला (एक दिवस २५ हजार रुपये) असे व्हिला उपलब्ध आहेत.

टॉप-एण्ड कॅटेगरी या प्रवर्गात खासगी स्विमिंग पूरसह रॉयल एक्झेक्युटीव्ह व्हिला बुएना व्हिस्टा रिसोर्ट्समध्ये देण्यात आला आहे. ज्याच्यासाठी एका दिवसाचं भाडे म्हणून १ लाख २० हजार रुपये आकारण्यात येतात. अत्यंत आलिशान अशा या व्हिलामध्ये बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.

Leave a Comment