“ड्रायर’ वापरण्यापूर्वी काळजी घ्या


वॉशिंग मशिन आणि ड्रायिंग मशिन ही सध्या महत्त्वाची यंत्रे आहेत. पटकन कपडे वाळवण्यासाठी ड्रायिंग मशिनचा वापर केला जातो. मात्र काही कपड्यांच्या बाबतीत याचा वापर करणे चुकीचे ठरते. आपले कपडे व्यवस्थित राहावेत, खराब होऊ नयेत, ते फाटू नयेत, असे वाटत असल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, प्रत्येक कपडा ड्रायरमध्ये सुकवून चालत नाही. काही प्रकारचे कपडे ड्रायरमध्ये सुकवल्यानंतर ते आकुंचन पावतात. ड्रायरमध्ये कोणते कपडे सुकवू नयेत, याविषयी माहिती असणे आवश्‍यक ठरते.

बाथिंग सूट – उन्हाळ्याच्या दिवसात किनारपट्टीवर गेलात तरच बाथिंग सूट वापरला जातो. मात्र तो ड्रायरला सुकवला तर त्याचा आकार बदलतो तसेच त्याची शिलाई बिघडते. तो सैल पडून शिलाई उसवते.

जीन्स- जीन्स धुणे आणि ती वाळवणे हे एक अवघड काम असते. जीन्स मशिनमध्ये धुतली जाते. पण ती मशिनमध्ये धुतल्याने आणि सुकवल्याने तिचा रंग फिका होतो आणि ती स्वच्छही धुतली जात नाही. अगदीच मशिनमध्ये धुवायची असल्यास धुताना थोडे मीठ घालायचे.

कॅशमेयर कापड ः कॅशमेयर कापड सुंदर दिसते, मात्र या कापडाचा पोशाख मशिनमध्ये धुतला तर त्याचे मापच बदलून जाते; शिवाय त्याचा पोतही बिघडतो. त्यासाठी हे कपडे हाताने हलका साबण लावून धुतले पाहिजेत.

मोजे – मोज्यांचा वापर नियमित होतो; पण तरीही ते मशिनमध्ये धुवू नयेत. मशिनमध्ये धुवून सुकल्याने मोजे खराब होतात. त्यांचे इलॅस्टिक सैल पडते. मशिनला लावायचेच असल्यास “मॅश बॅग’ नावाची पिशवी असते. त्यात घालून ते मशिनमध्ये टाकून धुता येतात. त्यामुळे मोजे स्वच्छ होतात, सुकतात, पण त्याचे इलॅस्टिक सैल होत नाही.

झिपर्स- चेन असणारे कपडे मशिनमध्ये धुवू नयेत. धुवायचे असल्यास चेन लावून मगच धुवावेत. ड्रायरला लावताना ते पिळून टाकू नका.

टॉवेल- बऱ्याचदा टॉवेल मशिनमध्ये धुतल्याने आटतात आणि त्यांचे धागे घट्ट होतात. त्यामुळे ते मशिनमध्ये सुकवू नयेत.

टाईटस्‌- टाईटस्‌ मुळातच योग्य मापाच्या, थोड्या घट्ट असतात. त्यामुळे त्या ड्रायरला सुकवू नयेत. त्या अधिक घट्ट होण्याची शक्‍यता असते.

अंतर्वस्त्रे- अंतर्वस्त्रे हाताने धुवावीत. कारण मशिनमध्ये ती खराब होतात आणि नीट बसत नाहीत.

कलाकुसरीचे कपडे- कोणत्याही पोशाखाला जास्त कलाकुसर, खडे, टिकल्या किंवा जर्दोसी प्रकारातील कलाकुसर केली असेल तर ते कपडे मशिनमध्ये धुवू नयेत. तसेच ड्रायरमध्येही टाकू नयेत, कारण त्याची कलाकुसर खराब होते.

धावण्याचे बूट- धावताना वापरण्याचे शूज कधीही मशिनमध्ये धुवू नयेत आणि ड्रायरमध्ये सुकवू नयेत. मशिनमध्ये टाकल्याने बुटांचे आयुष्य कमी होते.

Leave a Comment