जाणून घ्या का आणि कधी लागू होते राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्रात सत्ता संघर्ष संपला असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाल्यानंतर देखील दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन केले नव्हते. मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र अखेर निश्चित वेळेत शिवसेना देखील सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरली. त्यानंतर तिसरा सर्वाधिक मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपण्याच्या आधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यपालांनी प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली आहे. महाराष्ट्रात या आधी 1978 आणि 2014 ला राष्ट्रपती राजवट लागलेली आहे.

राष्ट्रपती राजवटीची संवैधानिक व्यवस्था –

राष्ट्रती शासनासाठी घटनेच्या कलम 356 मध्ये प्रावधान देण्यात आलेले आहे. यानुसार, जर राज्य सरकार संविधानानुसार कार्य करत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. यासाठी राज्यपालांच्या अहवालाची गरजच आहे असे काही नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत दोन्ही संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते.

जर याकाळात लोकसभा भंग झाली तर राज्यसभेकडून मान्यता घेणे गरजेचे असते. तसेच लोकसभा स्थापन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांची मान्यता घेणे गरजेचे असते.

बहुमत नसल्याने राष्ट्रपती राजवट –

जर कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसेल तर अशावेळी राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी लागू होते. 6 महिन्यानंतर देखील कोणी स्पष्ट बहुमत सिद्ध करू शकले नाही तर पुन्हा निवडणुका घेतल्या जातात.

राष्ट्रपती राजवटीचा कालावधी –

राष्ट्रपती शासनाचा कालावधी हा 6 महिने असू शकतो. मात्र त्यात 6-6 महिने वाढ करत हा कालावधी 3 वर्षांचा देखील करता येतो.

यामुळे म्हटले जाते राष्ट्रपती राजवट –

या काळात राज्याचे नियंत्रण मुख्यमंत्र्याच्या ऐवजी राष्ट्रपतींकडे असते. मात्र प्रशासकीय दृष्टीकोनातून राज्यपालांना केंद्र सरकारद्वारे कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात येते. प्रशासनात मदत करण्यासाठी राज्यपाल सल्लागारांची नेमणूक करतात. या काळात विधानसभा विसर्जित करण्यात येते. राष्ट्रपती राजवटीमध्ये राज्यातील सत्ता राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे असते

 

Leave a Comment