आपल्या नखांची काळजी कशी घ्याल?


आपण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल किती दक्ष असतो..आपली वेशभूषा, आपली केशरचना, प्रसाधन, हे सगळेच किती काळजीपूर्वक निवडत असतो आपण..या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना काही लहान गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. उदाहरणार्थ आपल्या हातांची आणि पायांची नखे. हातांची आणि पायांची नखे नेटकी असतील तर त्यामुळे हातांना आणि पायांना एक आगळे सौंदर्य प्राप्त होत असते. सतत तुटणारी ,रुक्ष झालेली नखे सगळ्यांनाच त्रासाची वाटतात. नखांना पुरेसे पोषण , आर्द्रता आणि काळजी मिळत नसली तर नखे रुक्ष होऊन तुटतात. अश्या प्रकारच्या नखांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ती पिवळी दिसायला लागतात. त्यामुळे अगदी महागातले महाग नेल पॉलिश लावले किंवा मॅनिक्युअर करवून घेतले तरी तुटणारी नखे सुंदर दिसू शकत नाहीत. आपल्या नखांची काळजी घेण्यासाठी कुठल्याही पार्लर मध्ये जाणायची गरज नाही , कारण यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरात अगदी सहज सापडू शकतात . अगदी साध्या वस्तूंच्या मदतीने आपल्या नखांची योग्य काळजी घेतली जाऊ शकते. कसे ते पाहूया ..

नखांना नियमितपणे बदामाचे तेल लावल्यास नखांचा रुक्षपणा दूर होऊन नखांना आर्द्रता मिळण्यास मदत होते. बदामाच्या तेलाने रोज मसाज केल्यास नखे चमकदार, सुदृढ दिसू लागतात. तसेच विटॅमिन “इ” युक्त तेलाने नखांना मसाज केल्यासही नखांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल. विटॅमिन “इ” च्या कॅप्सूल मधील जेल सुधा या कामी उपयोगी पडते. विटॅमिन “इ” च्या कॅप्सूल्सचे नियमित सेवन नखांच्या तसेच केसांच्या आरोग्याला फायदेकारक आहे.

अॅपल सायडर विनेगर नखांच्या आरोग्याकरिता अतिशय गुणकारी आहे. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि लोह नखांच्या आरोग्याकरिता उत्तम पोषण देतात. त्याचबरोबर या मध्ये असलेले acid नखांवर येणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यास मदत करते. त्याचबरोबर ग्रीन टी सुद्धा नखांसाठी उत्तम आहे. ग्रीन टी मुळे नखांचा पिवळसरपणा दूर होण्यास मदत मिळते.

सतत नेल पॉलिश आणि रिमूव्हर वापरल्यामुळे देखील नखे पिवळी दिसू लागतात. त्यामुळे नेल पॉलिश चा अतिरेकी वापर टाळायला हवा. सतत पाण्यामध्ये काम केल्याने नखांची आर्द्रता कमी होते. गृहिणींच्या बाबतीत हे नेहमीच होत असते. अश्या वेळी रोज रात्री झोपण्याआधी नखांना एखाद्या चांगल्या मॉइश्चरायझर ने मसाज करावे. त्यामुळे नखे निरोगी आणि चमकदार राहतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment