दीपक चहरने नव्हे तर टी-२०मध्ये ‘या’ खेळाडूने घेतली पहिली ‘हॅट्ट्रीक’


नवी दिल्ली – दीपक चहरने नव्हे तर टी-२० प्रकारात एकता बिष्टने या महिला क्रिकेटपटूने भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक साधली आहे. बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात दीपक चहरने हॅट्ट्रिकसह ६ गडी बाद केले होते. तेव्हा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चहर टी-२० मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला असल्याचे ट्विट केले. पण यानंतर नेटीझन्ससह अखिल भारतीय महिला काँग्रेसने बीसीसीआयला धारेवर धरले.


अखिल भारतीय महिला काँग्रेससह ट्विटर यूजर्संनी बीसीसीआयच्या त्या ट्विटनंतर चहरच्या आधी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकता बिष्टने हॅटट्रिक घेतली असल्याचे खडेबोल सुनावले. अखिल भारतीय महिला काँग्रेसने बीसीसीआयच्या ट्विटवर रिट्विट करत म्हटले की, आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेणार्‍या आपल्या आकडेवारीत एकता बिष्टला बीसीसीआय कशी काय विसरली. दीपक चहर पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे. पण एकता ही पहिली भारतीय खेळाडू आहे. जिने २०१२ मध्ये हा पराक्रम केला होता.


दरम्यान, ऑक्टोबर २०१२ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळताना एकताने पहिली हॅट्ट्रिक साधली होती. श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात तिने ४ षटकात गोलंदाजी करताना १६ धावा देत ३ गडी बाद केले होते. हा सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला होता.

Leave a Comment