राजम्यापासून सावध


बाजारात उपलब्ध असलेल्या उसळीसाठीच्या द्विदल धान्यांमध्ये राजमा आता मानाचे स्थान पटकवायला लागला आहे. विशेषतः पंजाबी माणसाच्या जेवणात राजमा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. ते द्विदल धान्य असल्यामुळे त्यात प्रोटीन आणि ड जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे राजमा हा पौष्टीक आहे असे आपण समजत असतो. त्यात काही चूक नाही. परंतु आहारतज्ञांनी राजम्याबाबत आता एक गंभीर इशारा दिला आहे. राजमा आरोग्यासाठी जेवढा चांगला आणि पौष्टीक आहे तेवढाच तो नीट न शिजवता खाल्ला तर घातक आणि अनारोग्यकारक आहे, असे आहारतज्ञांचे म्हणणे आहे. राजम्याला इंग्रजीमध्ये किडनी बिन्स असले म्हटले जाते. त्याला नीट शिजवले नाही तर किंवा कच्चेच खाल्ले तर पोटाचे काही विकार जडू शकतात, असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

राजमा शिजवून खायचा असेल तर १०० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी डिग्री तापमानाला शिजवता कामा नये. त्या वरच्या तापमानाला शिजवला तर मात्र तो आपल्याला फायदेशीर आणि उपकारक ठरतो. तसेच तो सुरक्षितही असतो. या राजम्यामध्ये फायटोहिमॅग्लटीन नावाचे द्रव्य असते. तसे ते सगळ्याच प्रकारच्या उसळीच्या द्विदल धान्यांमध्ये असते. परंतु त्याचे प्रमाण किडनी बिन्स किंवा राजमा याच्यामध्ये जास्त असते. त्यामुळे अगदी मूठभर राजमा कच्चा किंवा अर्धवट शिजलेल्या अवस्थेत खाल्ला गेला तर तो खाणारा माणूस आजारी पडू शकतो. अशा प्रकारच्या राजमा खाल्ल्यामुळे विषबाधा होऊ शकते.

विषबाधेच्या प्रकरणांचा काही विशिष्ट भागाचा अभ्यास केला असता असे आढळले आहे की विषबाधेच्या प्रत्येक पाच प्रकारांमागचा एक प्रकार हा चुकीच्या पध्दतीने राजमा खाल्ल्यामुळे घडलेला असतो. त्यासाठी मूठभर राजमा खाण्याचीही गरज नाही. राजम्याचे चारपाच दाणे जरी कच्चा आणि अर्धवट शिजलेल्या अवस्थेत पोटात गेले तरीही ते आपला परिणाम दाखवतात. त्यामुळे डायरिया, पोटदुखी किंवा उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. काही वेळा उसळीपेक्षा वेगळ्या पध्दतीनेही राजमा खाल्ला जातो. पण त्याहीवेळा तो घातक ठरू शकतो. एपिडेमियालॉजी ऍन्ड इन्फेक्शन या मासिकामध्ये राजमा अर्ध्या कच्च्या अवस्थेत खाल्ल्यामुळे होणार्‍या परिणामांची व्यापक चर्चा करण्यात आलेली आहे. काही लोक राजमा रात्री भिजवत ठेवून सकाळी शिजवून खातात परंतु अशा अवस्थेतसुध्दा अर्धा कच्चा शिजवलेला राजमा घातक ठरू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment