जम्मू-काश्मिरमधील युती लव्ह जिहाद होता का? -संजय राऊत


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. प्रेमाचा संवाद सर्वच नेत्यांचा एकमेकांशी सुरू आहे. राज्याविषयीच्या कर्तव्यांची प्रत्येक नेत्याला जाण आहे. राज्यात अस्थिरता राहू नये. त्याचबरोबर राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे त्याला आव्हान द्यावे यासाठी एकमत आहे. आम्हाला तत्वाच्या गोष्टी सांगू नये, जम्मू-काश्मिरमधील भाजप-पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

राज्यपालांकडून सत्ता स्थापनेच आमंत्रण शिवसेनेला मिळाल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत म्हणाले, सत्ता भाजप स्थापन करू शकला नाही. याचे खापर शिवसेनेवर फोडण चुकीचे आहे. कार्यवाही युतीच्या फॉर्म्युल्यानुसार झाली असती तर भाजपवर ही वेळ आली नसती. आपण वेळप्रसंगी विरोधी पक्षात बसू पण, मुख्यमंत्री पद शिवसेनेला देणार नाही, अशी अंहकाराची भूमिका घेतल्याने ही वेळ भाजपवर आली आहे. स्थिर सरकार देण्याची जबाबदारी भाजपचीच असल्याचे राऊत यांनी भाजपविषयी बोलताना स्पष्ट केले.

खोटे बोलून ज्यांनी अंहकाराच्या भूमिकेतून राज्याला या परिस्थितीत ढकलले ते महाराष्ट्राचे गुन्हेगार असल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री नको असे राज्यातील प्रमुख पक्षांची गेल्या काही दिवसांपासून भूमिका आहे. त्यामुळे काही मुद्यांवर मतभेद असतात. भाजपसोबतही आहेतच. पण, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष काही अफगाणिस्तानात तयार झालेले नाही. राष्ट्राच्या उभारणीत सर्व पक्षांचे योगदान आहे. आम्हाला तत्वाच्या गोष्टी सांगू नये, तसे असेल तर जम्मू-काश्मिरमधील भाजप-पीडीपीची युती लव्ह जिहाद होता का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

भाजप नको असे जे पक्ष म्हणत होते, आता त्या पक्षांच्या कसोटीचा हा काळ आहे. जे बोलत होते, ते करून दाखवण्याची वेळ आली आहे. मी त्यांना भूमिकेला चिटकून राहण्याच आवाहन करेल. शेतकरी, बेरोजगारी, महागाई या किमानसमान सूत्रांवर हे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.

राऊत अरविंद सावंत यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना म्हणाले, अरविंद सावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. खोटे बोलत असतील तर कशासाठी त्या वातावरणात राहावे. ज्या गोष्टी शिवसेनेसोबत ठरल्या होत्या. त्या मानण्यास तयार नाही मग कोणती युती राहिली आहे. युती ही फक्त औपचारिकता राहिली आहे. सावंत यांच्या राजीनाम्याचा काय अर्थ काढायचा तो काढा, असे सांगत भाजपा-शिवसेना युती तुटली असल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

Leave a Comment