शब्दकोडे सोडवा, तल्लख राहा


दररोज शब्दकोडे सोडविण्यामुळे उतारवयात मेंदू अधिक कार्यक्षमतेने काम करतो, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे. शब्दकोडे सोडविल्यामुळे एकाग्रता, तर्कबुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते, असे शास्त्रज्ञांना आढळले.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटर आणि किंग्ज कॉलेज लंडन या संस्थांतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी 50 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 17 हजार निरोगी व्यक्तींच्या माहितीची छाननी केली. ही माहिती गोळा करण्यासाठी ऑनलाईन चाचणी करण्यात आली.

या व्यक्ती किती शब्दकोड्यांसारखे कोडे सोडवतात, असे संशोधकांनी त्यांना विचारले होते. शाब्दिक कोडी सोडविणाऱ्या लोकांचा मेंदू त्यांच्या वयापेक्षा दहा वर्षे लहान असलेल्या लोकांच्या मेंदूसारखे कार्य करतो, असे त्यांना आढळले.

“शब्दकोडी सोडविण्याची वारंवारता आणि स्मरणशक्तीची नऊ कार्ये यांच्यामध्ये थेट संबंध असल्याचे आम्हाला दिसून आले,” असे युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटरचे प्रोफेसर कीथ वेस्नेस म्हणाले.

“आता प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये चाचण्या घेऊन आपल्याला हा रोमांचक संबंध सिद्ध करावा लागेल. जेणेकरून कोडी सोडविल्यामुळे मेंदूच्या कार्यात सुधार होतो का, हे कळून येईल,” असे वेस्नेस यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment