छातीत दुखत असल्याने संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल


मुंबई : आज दुपारी लिलावती रुग्णालयात शिवसेना खासदार संजय राऊत दाखल झाले. त्यांच्यावर छातीत दुखत असल्याने अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते पुढील दोन दिवस रुग्णालयात असणार आहेत. आता राऊत यांच्या ऐवजी वाटाघाटी आणि मेसेंजर म्हणून काम करण्याची जबाबदारी मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यावर असणार आहे.

संजय राऊत यांना रुटिन चेकअपसाठी दाखल करण्यात आले आहे. चिंता करण्याची गरज नसून आज संपूर्ण चेकअप केल्यानंतर उद्या त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार आणि संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली.

अपॉइंटमेंट घेऊन संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्यामुळे लिलावती रुग्णालयातील ११ वा मजला पूर्ण कॉर्डिन ऑफ करण्यात आला. आता पुढील दोन दिवस हृदयरोग तज्ज्ञ जलील परकार यांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

संजय राऊत यांच्या छातीत गेल्या अनेक दिवसांपासून दुखत असल्यामुळे राऊत यांनी लिलावती रुग्णालयात दाखल होण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. त्यानुसार आपल्या कुटुंबाच्या आग्रहाखातर संजय राऊत यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांच्या अनेक टेस्ट करण्यात आल्यामुळे त्यांना पुढील दोन दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Comment