लवकरच विवाहबद्ध होणार ‘दंगल गर्ल’ बबिता फोगट


‘दंगल गर्ल’ अर्थात कुस्तीपटू बबिता फोगट हिच्या जीवनात आता नवे वळण येणार आहे. भाजपच्या साथीने काही दिवसांपूर्वीच राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारी बबिता येत्या काही दिवसांमध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे.

याविषयीची माहिती खुद्द बबितानेच दिली. हा विवाहसोहळा १ डिसेंबरला चरखी दादरी येथील बलाली या गावी हरयाणवी पद्धतींनुसार पार पडेल. ज्यानंतर दिल्लीमध्ये २ डिसेंबरला एका दिमाखदार स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

बबिता मुळचा नजफगढ येथे राहणाऱ्या विवेक सुहाग याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. विवेक हासुद्धा कुस्तीच्या खेळात सक्रीय आहे. बबिताच्या लग्नाची माहिती समोर येताच क्रीडाक्षेत्रातून आणि मित्रपरिवारातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. बबिता आपल्या या विवाहसोहळ्यासाठी क्रीडा आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करणार आहे. तर, तिच्या लग्नाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा निमंत्रण असेल असेही तिने स्पष्ट केले.

गीताने दादरी येथील भाजप पक्ष कार्लायलयात रविवारी कार्यकर्त्यांची भेट घेतली त्याचवेळी ही अत्यंत महत्त्वाची तिने बाब समोर ठेवली. मी माझ्या जीवनात एका नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्यामुळे मला तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे. माझ्या लग्नासाठी तुम्ही सर्वजण आमंत्रित असल्याचे बबिता म्हणाली. आपल्या या नात्याविषयी फार गोष्टी उघड न करता, २०१४ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान विवेकला पहिल्यांदा भेटल्याचे तिने सांगितले. हे नाते पहिल्या भेटीनंतर जवळपास पाच वर्षे आकारास आणल्यानंतर त्यांनी यंदाच्या वर्षी जून महिन्यात लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment