एसीपासून सावध


सध्या लोक फार नाजूक झाले आहेत. हवेतील उष्मा त्यांना सहन होईनासा झाला आहे. त्यामुळे घर तेथे एसी असे चित्र निर्माण होत आहे. पूर्वीच्या काळी वातानुकूलन यंत्र असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. परंतु आता हे यंत्र आता सामान्य झाले आहे. त्यामुळे वातानुकूलन यंत्र असणार्‍या घरात राहणार्‍यांना दिलासा मिळत आहे. परंतु हळूहळू वातानुकूलन यंत्राचे दुष्परिणामही समोर यायला लागले आहेत. एसी वापरला पाहिजे परंतु तो वापरतानाच त्याचे हे दुष्परिणामसुध्दा दृष्टीआड करता कामा नये. पहिली गोष्ट म्हणजे ज्या खोलीमध्ये एसी बसवलेला असेल त्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या कडेकोट बंद केल्या जातात. कारण दारे, खिडक्या उघड्या राहिल्या किंवा खोलीच्या फटी उघड्या राहिल्या तर बाहेरची उष्ण हवा आत येते आणि एसीचा परिणाम कमी होतो.

असा परिणाम कमी होऊ नये म्हणून खोली अशी हवाबंद केली जात असल्याने खोलीला व्हेंटिलेशन राहत नाही. खोलीत आधीच असलेली हवा थंड केली जाते. त्यामुळे बरे वाटते. परंतु व्हेंटिलेशन नसल्यामुळे ताजी हवा खोलीत येत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे गुदमरल्यासारखे वाटते. एसी सुरू असताना आपण झोपतो. झोपताना तापमान बरेच खाली आणलेले असते. परंतु काहीवेळाने ते वाढवावेसे वाटते कारण आपल्या शरीराला नको एवढी थंडी त्या खोलीत निर्माण झालेली असते. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा काही वेळाने तापमान वाढवतो पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा तापमान वाढवू शकत नाही आणि ते मर्यादेपेक्षा कमी झाल्याचे दुष्परिणाम नकळतपणे आपल्या शरीरावर होत राहतात. झोपेमुळे ते जाणवत नाहीत पण होतात एवढे मात्र खरे.

सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे एसी हवेतील ओलावा शोषून घेत असतो आणि त्यामुळेच हवा थंड झाली तरी ती कोरडी झालेली असते. अर्थात एसी जसा हवेतला ओलावा शोषून घेतो तसाच तो आपल्या शरीरातलाही ओलावा शोषून घेत असतो आणि शरीरातला ओलावा कमी झाल्यामुळे आपण काही प्रमाणात अस्वस्थ होतो. त्यातून डोकेदुखी, स्नायूंचे आकुंचन, पाठीचे दुखणे इत्यादी विकार बळावण्याची शक्यता असते. काही वेळा सांध्यामध्येही दुखायला लागते आणि एसीचा अधिक वापर करणारी व्यक्ती संधीवाताचा रुग्ण होण्याची शक्यता असते. तेव्हा एसी वापरला पाहिजे परंतु एसीपासून सावधही राहिले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment