छातीत होणारी जळजळ टाळणे शक्य


काही आम्लपित्त होणार्‍या लोकांना पित्ताने छातीत जळजळ करायला लागते. काही जणांना तर कायम जळजळ होत असते. पण ते लोक तो त्रास सहन करतच जगत राहतात. ही छातीतली जळजळ का होते याची कारणे नीट समजून घेतली तर त्यापासून बचाव कसा करावा हे लक्षात यायला लागेल. छातीतली जळजळ ही आम्लामुळे होत असते. परंतु छातीमध्ये येणारे हे ऍसिड उदरातून किंवा पोटातून वर येत असते आणि त्यामुळे हा त्रास होतो. पोटात आम्लाचे प्रमाण वाढले की ते आम्ल वर चढून तोंडापर्यंत येते. खाण्यातील अनियमितता, जादा खाणे आणि चुकीचे अन्न खाणे यामुळे हा त्रास होत असतो. तेव्हा तो कमी करण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवावे आणि खाण्याचे वेळापत्रक सांभाळावे.

भूक लागल्यानंतर कोणीही काहीतरी खातेच. परंतु खूप भूक लागली आहे म्हूणन खूप खायला लागलो तर त्यातून आपण नव्या संकटाला निमंत्रण देत असतो. तेव्हा ज्या लोकांना खाण्याचे प्रमाण पाळता न आल्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास होत असेल त्यांनी अल्प आहार घ्यावा आणि आपण जो आहार घेणार आहोत तो चार ते पाच भागात वाटून चार-पाच वेळा थोडा थोडा खावा. काही लोकांना एकदा सकाळी जेवल्यानंतर दुसर्‍यांदा रात्रीच जेवणाची सवय असते. सकाळी जेवताना हे लोक आता यानंतरचे जेवण संध्याकाळीच आहे तेव्हा आता भरपूर जेवलेले बरे असे म्हणून सकाळी भरपूर जेवण करतात आणि रात्रीही खूप भूक लागल्यामुळे भरपूर जेवण करतात. अशांना छातीत जळजळ होण्याचा त्रास हमखास होतो.

काही लोकांना सपाटून भूक लागली आणि समोर अन्न आले की घाईघाईने खाण्याची सवय असते, असे लोक अन्नाचे चर्वण कमी करतात आणि ते चर्वण नीट न झाल्यास पाण्याच्या घोटाबरोबर अन्न पोटात ढकलतात. अशा खाण्याने तोंडातली लाळ अन्नात मिसळत नाही आणि अन्नाचे मोठे मोठे तुकडे पोटात जातात. परिणामी अपचन होते आणि पोटातल्या अन्नात त्यातले ऍसिड नीट न मिसळल्याने ते विरुध्द दिशेने छातीकडे यायला लागते. आपण जेव्हा तेलकट पदार्थ भरपूर खातो तेव्हा ते लवकर पचन होत नाहीत आणि पोटात तसेच राहतात. त्यामुळे ते खाणार्‍याला अवघडल्यासारखे होते. अशा लोकांनी तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले, दळलेले असे पदार्थ जास्त खावेत. दारू पिण्यानेही छाती जळजळ होते. छातीत जळजळ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॉफी. ती पोटातले ऍसिड वाढवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment