सर्दी लवकर बरी करण्याचा उपाय


हवामान बदलले की अनेक लोकांना सर्दीचा त्रास होतो. मग ती दुरूस्त व्हावी म्हणून नाना प्रकारचे उपाय केले जातात. बाम लावणे किंवा सर्दी प्रतिबंधक गोळी घेणे हे उपाय तर अगदी सामान्य आहेत. मात्र त्यांचे बरेच दुष्परिणामही होतात. त्यामुळे शहाणे लोक औषधी वनस्पतींचा वापर करून सर्दी रोखावी अशी शिफारस करत असतात. त्यादृष्टीने आपल्या घरात असणारे आले किंवा आपल्या दारातल्या वृंदावनातली तुळशी यांचा उपयोग केला जात असतो. तुळशीच्या मंजिरीचे बी पाण्यात टाकून त्याचा काढा करून घेतल्यास सर्दी थांबते. हे बर्‍याच लोकांना आता माहीत झालेले आहे. मात्र तुळशी किंवा आले यांच्या वापराशिवाय आणखी काही गुणकारी औषधांचा वापर करता येऊ शकतो का यावर संशोधन जारी आहे.

या संशोधनातून असे निष्पन्न झाले आहे की सर्दी ही झिंकमुळे कमी होऊ शकते. तेव्हा सर्दीवर झिंकयुक्त औषधांची गोळी किंवा झिंकचे मोठे प्रमाण असलेले खाद्यपदार्थ खाणे अशा उपायातून सर्दीचा प्रतिकार करता येऊ शकतो. बाम लावणे, गोळी घेणे किंवा तुळशीचा काढा या उपायाने सर्दी कमी व्हायला दोन-तीन दिवस लागतात. परंतु झिंकचा उपाय केल्यास सर्दी चोवीस तासाच्या आत बरी होते असा झिंकवर प्रयोग करणार्‍या शास्त्रज्ञांचा दावा आहे. या संबंधात युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी या विद्यापीठात संशोधन झालेले आहे आणि तिथे सर्दी झालेल्या शंभर लोकांवर प्रयोग केले गेले आहेत.

या सर्दी झालेल्या शंभर जणांपैकी ५० जणांना पारंपरिक औषधे दिली गेली आणि उर्वरित ५० जणांना झिंकयुक्त आहार किंवा गोळी दिली गेली. त्यावेळी असे आढळले की झिंकची गोळी घेणार्‍यांची सर्दी ताबडतोब कमी झाली तर परंपरागत औषधे घेणार्‍यांची सर्दी कमी व्हायला तीन दिवस लागले. यावरून असे सिध्द झाले की सर्दीवर झिंकयुक्त गोळी किंवा खुद्द झिंकची गोळी दिली गेली तर तुरंंत उपाय होऊ शकतो. त्यामुळे आता येत्या काही दिवसात झिंकच्या गोळ्या बाजारात आणल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात हे करण्यापूर्वी सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातील आणि झिंकची गोळी हानीकारक नाही ना याची खात्री करून घेतली जाईल. कारण झिंकच्या गोळीचे काही दुष्परिणामसुध्दा आहेत. झिंकची गोळी त्याचवेळी घेतल्या गेलेल्या दुसर्‍या एखाद्या औषधाशी रासायनिक प्रक्रिया घडवू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment