लिंबापेक्षा त्याची साल भारी


लिंबू हे फळ किती लाभदायक असते हे आपण नेहमीच वाचतो पण आपल्याला लिंबाच्या सालीची माहिती नाही. ती दिली तर आपण साल कधीच फेकून देणार नाही कारण लिंबापेक्षा त्याची साल दसपटीने लाभदायक असते. कितीतरी प्रकारे ती औषधी म्हणून वापरता येेते. कारण ती कॅल्शीयम, पोटॅशियम, क जीवनसत्त्व यांनी परिपूर्ण असते. ती हाडांच्या मजबुतीसाठी फार गुणकारी असते. तिच्यात असे काही घटक आहेत की ज्यांचा वापर कर्करोग प्रतिबंधक म्हणून होत असतो. हाडांचे काही विकार कमी करण्यात सालीचा वापर होतो. दातांच्या काही विकारांनाही ही साल हे औषध आहे. लिंबाच्या सालीतले पेप्टीन हे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.

लिंबाच्या सालीत असलेल्या जीवनसत्त्वाचे प्रमाण लिंबातल्या जीवनसत्त्वापेक्षा दहापटीने जादा असते. त्यातल्या पॉलीफेनॉल फ्लेवराईडस्मुळे शरीरातल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित होते. सालीतल्या पोटॅशियममुळे रक्तदाबही आटोक्यात रहातो. त्वचेच्या काही त्रासांनाही सालीचा उपयोग होतो. त्वचेवर पडलेेले काळे डाग, सुरकुत्या आणि त्वचा सोलण्याचा त्रास लिंबाच्या सालीच्या लेपणाने कमी होतो. ही साल इतकी गुणकारी आहे की तिच्यामुळे शौचाला साफ होते आणि अनेक संसर्गापासून बचाव होतो. लिंबाची साल वापरण्याची पद्धत काही फार अवघड नाही.

ही साल काही तासांसाठी डीप फ्रिचमध्ये ठेवा आणि बाहेर काढून तिला किसा. हा कीस नंतर जेवणात किंवा कोणतेही पेय पिताना त्यात मिसळा. तिच्या सेवनाने होणारे लाभ या प्रकाराने आपल्याला घेता येतील. किंवा लिंबाच्या साली २०० अंश से. तापमानाला वाळवा. त्याचा चुरा करून त्यात मिरे आणि खडे मीठ मिसळा. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे दळलेले मिश्रण आपल्या जेवणात तोंडी लावल्यासारखे वापरा. त्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे लिंबाच्या साली वाळवून त्यांची मिक्सरमधून पावडर करून घ्या. ही बारीक पावडर नंतर एका डबीत ठेवून द्या आणि ती आपल्या त्वचेवर लावत चला. या लेपाचा उपयोग त्वचेच्या आरोग्यास सांभाळेल. वृद्धत्वाचे त्वचेवर होणारे परिणाम या लेपामुळे कमी होतील. त्वचेवर पडणारे उन्हाचे काळे डागही या औषधाने कमी होतील. लिंबाच्या सालीचा उपयोग फळांचा ताजेपणा टिकवण्यासाठीही होतो. लिंबाची साल एका भांड्यात ठेवा आणि त्यात फळाच्या फोडी ठेवून त्यांना फ्रिजमध्ये ठेवून द्या. फळांवर पडणारे काळे डाग यामुळे पडणार नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment