यशस्वी जीवनाची पाच सूत्रे


आपले आयुष्य यशस्वी असावे आणि सर्वांनी आपल्याकडे यशस्वी व्यक्ती म्हणून बघावे असे कोणाला वाटत नाही? प्रत्येकजण आपापल्या परीने यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येकालाच यशस्वी होण्याची सूत्रे गवसलेली असतातच असे नाही. वास्तविक पाहता यशस्वी होण्याची सूत्रे तशी फार सोपी आहेत आणि अशी अनेक सूत्रे अनेकांकडून सांगितलीही जात असतात. परंतु ती संख्येने एवढी जास्त असतात की आपल्याला नेमके काय करावे हे समजत नाही. परंतु अशा अनेक सूत्रांमधून निवडक पाच सूत्रे काढण्यात आली आहेत. त्यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास आपण यशस्वी जीवन जगू शकतो. १. तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा – आपण आपल्या भोवती असे अनेक लोक बघतो की जे लहानपणापासूनच एक वेगळेच स्वप्न बघत असतात. प्रत्यक्षात मात्र ते त्या स्वप्नापेक्षा वेगळा व्यवसाय करत असतात.

आपले स्वप्न आपला छंद आणि आपली आवड हाच आपला व्यवसाय कसा होईल याचा प्रयत्न करणे म्हणजेच यशस्वी जीवनाचे पहिले सूत्र होय. २. जीवापाड प्रयत्न करा – हे स्वप्न पूर्ण करत असताना आपल्यात जेवढी शक्ती असेल आणि जेवढी क्षमता असेल तेवढी पणास लावून प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न करणारे लोकच शून्यातून ब्रम्हांड निर्माण करत असतात. ३. गुणग्राहकता – जिथे एखाद्या व्यक्तीचे कौतुक करण्याची गरज असेल तिथे कसलाही संकोच न बाळगता त्या व्यक्तीची प्रशंसा करा त्यामुळे कसलाही पैसा न खर्च करता माणसे जोडली जातात. केवळ शब्दांनी जोडली गेलेली माणसे आपल्या भावी आयुष्यात यश मिळवण्यास उपयुक्त ठरू शकतात.

४. सर्वांना मदत करा – आपल्या सभोवती अनेक गरजवंत लोक असतात आणि आपण अशा पदावर अधिकारावर असतो की जिथून आपण अनेकांना सहज मदत करू शकतो. तेव्हा जिथे म्हणून लोकांना मदत करण्याची संधी मिळेल तिथे कसलेही अनमान न करता लोकांना मदत केली पाहिजे. ५. नकार पचवायला शिका – आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना उनसावलीचा खेळ अनुभवाला येत असतो. आपण कोणाची तरी मदत घेताना कधी नकार येतो तर कधी भरभरून मदत मिळते. जीवनातले सगळेच प्रसंग आनंदाचे नसतात. तसेच ते दुःखाचेही नसतात. परंतु आपण दुःखाच्या प्रसंगात खचून जातो आणि नकळतपणे अयशस्वी होतो. म्हणून दुःख, अपयश, नकार या गोष्टी पचवायला शिकले पाहिजे.

Leave a Comment