सफरचंदाचे बी विषारी


सफरचंद या फळाबद्दल आपण किती तरी कौतुक ऐकत असतो. दररोज एक सफरचंद खाणारा कधी आजारी पडत नाही. सफरचंद खाल्ल्याने वजन वाढत नाही. ते वर्षभर मिळते. ते खरेदी करून आणले की घरात बरेेच दिवस टिकते. फ्रिजमध्ये न ठेवताही चांगले रहाते. पण हे फळ जितके चांगले आहे तितकेच त्याचे बी हानीकारक आहे. तेव्हा सफरचंद खाताना जरा सावधच राहिले पाहिजे. ते खाताना आपल्या तोेेंडात चार दोन बिया आल्या तर त्या नकळतपणे चावून खाऊ नका, लगेच न चावता त्या थुंकून टाका असा सल्ला या संबंधातल्या तज्ज्ञांनी दिला आहे. या बिया काही प्रमाणात विषारी असतात आणि त्यामुळे विषबाधा होते. त्या अधिक प्रमाणात खाल्ल्या गेल्या तर मृत्यूही ओढवला जातो. इतके हे बी धोकादायक आहे.

असे असले तरी फार घाबरण्याचे कारण नाही. हे बी फार कठीण असल्याने सहजा सहजी चावले जात नाही. त्यात ऍमिग्डालीन हे द्रव्य असते. तेच धोकादायक आहे. माणसाच्या पाचन संस्थेत जी एन्झाइम्स असतात त्यांच्याशी या बियातील ऍमिग्डालीन संयोग पावते तेव्हा या संयोगातून विषायी संयुग निर्माण होते. ऍमिग्डालीनमध्ये साखर आणि सायनाईड असते. हे द्रव्य शरीरात इंजेक्शनच्या रूपाने टोचले गेले तर त्यापासून हैड्रोजन सायनाईड तयार होते. हे सायनाईड माणसाला आजारी पाडते आणि वेळ पडल्यास मृत्यूलाही कारणीभूत ठरते. सायनाईड हे किती घातक असते हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

सफरचंदाच्या किती बिया विषारी ठरतात हे समजून घेतले पाहिजे. साधारणत: २०० बिया या विषारी ठरत असतात. त्या माणसाच्या हृदयावर आणि मेंदूवरही दुष्परिणाम करू शकतात. काही अपवादात्मक प्रकरणात त्यामुळे माणूस कोमात जाऊ शकतो. अर्थात उगाच कोणी सफरचंदाच्या २०० बिया खात नसते. पण तरीही साधारणत: पाच ते दहा बिया खाण्यात आल्या तरीही त्यांचे साधे परिणाम जाणवल्याशिवाय रहात नाहीत. कारण एक ग्रॅम बियामध्ये ०.०६ ते ०.२४ ग्रॅम एवढे विष असते. त्यामुळे मळमळणे, चक्कर येणे असे त्रास सुरू होतात. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून कधी आपल्याला बियांचा संबंध आलाच तर त्या अजिबात खाऊ नयेत. त्या नकळतपणे खाल्ल्या जाण्याचीही शक्यता कमीच कारण त्यांचे कवच जाड असते. ते सहजासहजी चावल्या जात नाहीत. तरीही सावध असलेले बरे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment