उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा 3 वेळा फोन


मुंबई : भाजप-सेनेतील महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तेचा संघर्ष अखेरच्या क्षणापर्यंत कायम असून अद्याप कोणतीही चर्चा त्यांच्यात झालेली नाही. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचे म्हणत भाजपवर टीका केली आहे. तसेच मध्यस्थीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही फटकारले आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर भेट घेण्यास येण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे यांना तीनवेळा फोन केला. पण एकदाही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ज्यावेळी कॉल केला, तेव्हा उद्धव ठाकरे दुसऱ्या कॉलवर असल्याचे सांगण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्यावेळी पुन्हा कॉल केला त्यावेळी उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्याचे उत्तर मिळाल्यानंतरही तिसऱ्यांदा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल केला. यावर पुन्हा उद्धव ठाकरे स्वत: फोन करतील असे उत्तर देण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चेसाठी दोघांचा मित्र असलेल्या एका उद्योजकाने प्रयत्न केले. पण त्यांना राजकारणावर चर्चा करू नये असे सांगण्यात आले.

Leave a Comment