सत्तासंघर्ष ; देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार - Majha Paper

सत्तासंघर्ष ; देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार


मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद बोलावली होती. फडणवीसांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर 4.30 वा पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही माध्यमांशी बोलण्यासाठी संध्याकाळी 6 वाजताचे निमंत्रण दिल्यामुळे उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत काय उत्तर देणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण विधानसभा निकालादिवशीच पत्रकार परिषदेसाठी येथे भेटलो होतो. मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची आज थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. मागील 5 वर्षात त्यांनी जे अचाट कामे केली ती ऐकली. त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्यासोबत 5 वर्ष आम्ही राहिलो नसतो तर त्यांना कामे करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आम्ही आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे.

त्याचबरोबर आमचे काय ठरले होते याला सर्व साक्षी आहेत. मी दिल्लीत लोकसभेच्यावेळी युतीसाठी गेलो नव्हतो, त्यासाठी भाजप नेते मुंबईत आले होते. आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव चर्चेत दिला होता. मात्र, सत्तेसाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे वचन दिले होते आणि ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न हे करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. मला त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. इतर कोणी मुख्यमंत्री असता तर पाठिंबा दिला असता की नाही माहित नाही. मी 124 जागा स्वीकारल्या. जिंकणाऱ्या जागा ठेऊन हरणाऱ्या दिल्या. माझ्याशी न बोलता साताऱ्याची जागा घेतली. उदयनराजे मोदींना काय म्हणाले होते, त्यांनी कोणते पेढे वाटले? असे देखील उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

भाजपच्या नेत्यांनी दुष्यंत मुख्यमंत्री होतील असे 2014 ला म्हटले आणि नंतर शब्द बदलला. भाजपने आम्हाला सरळ सांगावे की आमचे ठरले होते आणि ते शक्य होणार नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री बहुमत नसताना आमचेच सरकार येणार म्हणत आहेत. हे कसे येणार आहे मग. तुम्ही जर असे म्हणत आहेत तर आम्ही पर्याय ठेवले तर काय चुकीचे केले. तुम्ही जे चाळे केले त्यातूनच आम्हीही शिकल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एकटे सोडू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अशा स्थितीत कर्जमाफी, पीकविमा, दुष्काळी निधी पोहचला नाही, पंतप्रधानांच्या योजनेचे सहा हजार पोहचले नाहीत. मी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी माझी ओळख करुन द्यावी कारण अहमद पटेल यांच्याशी गडकरींची ओळख आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याशी अमित शाह यांची ओळख असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

मला खोटेपणासोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही. मी बाळासाहेब ठाकरेंना जे वचन दिले ते मी पूर्ण करणारच. एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच. यांना दुष्यंत चौटाला चालतात, उदयनराजेंकडून पगडी घालून घेतात आणि आम्हाला टोप्या घालतात. मीही कधीही अटलजी किंवा अडवाणी यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. मोदी आणि शहा यांच्यावर पण व्यक्तिगत टीका केलेली नाही, धोरणांवर टीका केली आहे. ज्यांना खरेपणाची किंमत नाही ते हिंदुच असू शकत नाही. मग हे खोटे हिंदू आहेत.

सरकार स्थापन करण्याचा दावा मी कोठेही केलेला नाही. मी जे ठरले त्याच्यापेक्षा अधिक काहीही नको असेच म्हटले आहे. आता मला संघाला विचारायचे आहे की खोटे बोलणारे लोक तुमच्या हिंदुत्वात बसतात का. हे खोटारडे लोक कोणत्या तोंडाने रामाचे नाव घेणार आहेत. महाराष्ट्राने ठरवायचे आहे त्यांना खरे बोलणारे लोक हवे की खोटे बोलणारे हवेत? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Comment