‘केबीसी’मध्ये शिवछत्रपतींचा एकेरी उल्लेख, संभाजी ब्रिगेड आक्रमक


पुणे – छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमावर सध्या टीकेची झोड उठवली जात असून छत्रपती शिवाजी महाराजांचा या कार्यक्रमाच्या एका भागात एकेरी उल्लेख केल्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सडकून टीका केली जात आहे.

सोनी टीव्हीवर ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा एक भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमाच्या एका प्रश्नाच्या उत्तरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी समोरच्या स्पर्धकाला ‘इनमे से कोनसे शासक मुगल सम्राट औरंगजेब के शासक थे’…? असा प्रश्न विचारला आणि या प्रश्‍नावर नंतर महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी, असे ४ पर्याय देण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले आहे.

तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न सोशल मीडियावरही विचारला जात आहे. याबद्दल काहींनी बिग बींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तात्काळ या सर्व संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंद न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Comment