राज्यातील सत्तासंघर्षाला वेग, दौरा अर्धवट सोडून शरद पवार मुंबईत दाखल


मुंबई – राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, तो दावा भाजपने केला नसल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज आपल्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे काँग्रेसने आदेश दिले आहेत. तर आपला दौरा अर्धवट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही मुंबईत येणार असल्यामुळे राज्यातील नवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भाजपला निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी 15 दिवस उलटले तरी भाजपकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला नाही. त्यातच त्यांच्या काही नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापन करण्याचा दावा करणे, अपेक्षित असताना त्यांनी केवळ चर्चा केली. त्यामुळे राज्यात शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाहेरून काँग्रेसचाही त्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा घेऊ शकते, अशी शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आपला नियोजित कोकण दौरा रद्द करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईत पोहोचत आहेत. तर आपल्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश काँग्रेसने दिले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या तरूण आमदारांसह अनेक वरिष्ठ नेतेही सकारात्मक आहेत. त्यातच माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. तर सेनेला पाठिंबा देण्यासाठी काही आमदारांनी आपल्या सह्यांचे एक निवेदन तयार करून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेण्याचे निश्च‍ित केले होते. त्यामुळे राज्यात सेनेच्या सत्ता स्थापनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही महत्वाची भूमिका बजावू शकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, काल काँग्रेसने रात्री उशिरा सुरू झालेल्या घडामोडींमध्ये आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईतून थेट राजस्थान अथवा मध्यप्रदेशात गुप्तस्थळी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अल्पमतातील सरकार स्थापन करण्यास भाजपकडून पुढाकार घेतला जाणार नसल्याचे एका वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून आपल्याकडे असलेला बहुमताचा आकडा आणि त्यासाठीची यादी राज्यपालांना सादर केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Leave a Comment