मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या संभाजी भिडेंना ‘मातोश्री’वर प्रवेश नाकारला!


मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेला सत्ता संघर्ष आता विकोपाला गेला असून हा संघर्ष दिवसेंदिवस इर्षेला पेटला आहे. त्यातच मातोश्री भाजपसाठी ‘नॉट रिचेबल’ झाली असल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून, संभाजी भिडे भाजपच्या वतीने मातोश्रीवर आले. पण मातोश्रीवर संभाजी भिडेंनाही प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे, शिवसेना भाजपवर किती नाराज आहे याची प्रचिती आली.

संभाजी भिडे गुरुजी काल संध्याकाळी 7.30च्या सुमारास ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. पण सुरक्षारक्षकांकडून त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मातोश्रीवर नसल्याचे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक स्थळी गेले होते. भिडे गुरुजी त्याचवेळी मातोश्रीवर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांना ही बाब कळताच, त्यांनी अनिल परब यांना फोन करून ‘भिडे मोठे व्यक्तिमत्त्व आहेत, तुम्ही जाऊन त्यांची भेट घ्या’ असे सांगितल्याचे समजत आहे. शेवटी शिवसेना नेते अनिल परब मातोश्रीवर दाखल झाले. भिडे यांची भेट घेत त्यांनी ‘साहेब मातोश्रीवर नाहीत, साहेब फोन करून बोलवतील तेव्हा भेटीस या’ असे सांगितले. त्यानंतर, भिडे हे मातोश्रीवरून निघून गेले.

Leave a Comment