मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या आजीबाई चक्क निघाल्या लखपती

भीक मागणे आपल्या देशात बेकायदेशीर आहे. असे असले तरी असंख्य लोक रस्त्यांवर भीक मागताना आपण पाहत असतो. मात्र फाटके कपडे, बिना चप्पल भीक मागतानाचे दिवस आता संपले आहेत. मागील काही दिवसांमध्ये भिकाऱ्यांकडे लाखो रूपये सापडले आहेत. आता असेच एक प्रकरण पुद्दुचेरी येथून समोर आले आहे.

पुद्दुचेरी येथील पोलीस एका मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना उठवण्यासाठी गेले होते. मंदिराच्या पायऱ्यांवर एक आजीबाई हातात ताट घेऊन भीक मागण्यासाठी बसल्या होत्या. या आजी जागेवरून हलण्यास तयार नव्हत्या. अखेर जेव्हा पोलिसांनी या आजींना जबरदस्तीने तेथून हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर जे दिसले, ते पाहून पोलीस देखील हैराण झाले.

परवर्थम नावाच्या या आजींच्या पिशवीत तब्बल 15000 रूपये रोख होते. एवढेच नाही तर त्या पिशवीत एका बँकेचे पासबूक देखील होते. पासबुकनुसार, आजींच्या खात्यात तब्बल 2 लाख रूपये जमा होते. पोलिसांनी याविषयी चौकशी करताच भीक मागणाऱ्या आजींनी हे पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांनी दिल्याचे सांगितले.

या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना वृध्दाश्रमात पाठवले आहे व त्यांच्या कुटूंबाशी देखील संपर्क केला आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड देखील आढळले. याआधी देखील अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत, जेथे भिकाऱ्यांकडे लाखो रूपये आढळलेले आहेत.

Leave a Comment