आगामी चित्रपटासाठी खिलाडी कुमार घेणार डोळे चक्रावणारे मानधन


वर्षभरात किमान चार-पाच वेळा तरी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार रुपेरी पडद्यावर पहायला मिळतो. अक्षय कुमारचे २०१९ मध्ये तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामध्ये ‘केसरी’, ‘मिशन मंगल’ आणि ‘हाऊसफूल ४’ या चित्रपटांचा समावेश आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगली कमाई देखील केली. याव्यतिरिक्त अक्षय कुमार करण जोहरच्या आगामी ‘गुड न्यूज’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. येत्या २७ डिसेंबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर त्याचे पुढच्या वर्षी ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत.

अक्षयने एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता आणखी एक चित्रपट साईन केला असल्याचे म्हटले जात आहे. अक्षयने या चित्रपटासाठी त्याच्या मानधनात वाढ केल्याचे देखील म्हटले जात आहे. यासंदर्भात ‘बॉलिवूड हंगाम’ने दिलेल्या वृत्तानुसार वासु भगनानी आणि ‘एअरलिफ्ट’ चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल आडवाणीसोबत अक्षय कुमार एक पॉवर पॅक चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. अॅक्शन, इमोशन आणि मनोरंजनाचा मारा या चित्रपटात करण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित असल्याच्या देखील चर्चा आहेत.

त्याचा आगामी चित्रपट बिग बजेट असून लंडनमध्ये त्याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटासाठी अक्षयने होकार दिला असला तरी याचितत्रपटासाठी त्याने १०० कोटी रुपये मानधन मागितल्याचे म्हटले जात आहे. आता त्याने मागितलेल्या एकूण मानधनावरुन तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरणार आहे.

Leave a Comment