विराटच्या one8 commune हॉटेलमध्ये मिळतात हे अफलातून पदार्थ


क्रिकेटच्या मैदानात आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांची झोप उडवणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. विराट फक्त क्रिकेट प्रेमीच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी आदर्शस्थानी आहे. त्याचा एक व्यक्ती, खेळाडू म्हणून वावरसुद्धा अनेकांसाठी फार महत्त्वाचा ठरतो. क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या विराटने त्याचा मोर्चा आता एका वेगळ्या गोष्टीकडे वळवला आहे.


खाद्यपदार्थांचा शौकिन असणाऱ्या विराटने आपल्या आवडीचे पदार्थ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी one8 commune नावाचे एक नवे हॉटेल सुरु केले आहे. त्याच्या या हॉटेल सुरु करण्यामागच्या संकल्पनेचा उलगडा नुकत्याच एका मुलाखतीत करण्यात आला. त्याचबरोबर त्याच्या हॉटलेमध्ये मिळणाऱ्या काही पदार्थांवरही प्रकाशझोत टाकला गेला.


विराटने ‘कर्ली टेल्स’शी संवाद साधताना हे हॉटेल नेमके कसे आणि कधी सुरु झाले यावरुन पडदा उचलला. घरात लहानपणापासूनच खाद्यापदार्थां विषयीच्या चर्चा, बरेच पदार्थ यांची रेलचेल होती. त्यातच दिल्लीच्या रस्त्यांवर मिळणारे चटपचीत पदार्थसुद्धा भरीला असल्याचे सांगत विराटने या मुलाखतीत आपण खाद्यप्रेमी असल्याचे सांगितले. one8 commune हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी विराटच्या आवडीच्या पदार्थांचीही चव चाखता येत आहे.


विराटची हॉटेल व्यवसायात उडी मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने याआधीसुद्धा खाद्य व्यवसायात उडी घेतली होती. नवी दिल्लीत सुरु झालेलं one8 commune हे one 8 या त्याच्या ब्रँडअंतर्गत येणारे हॉटेल असल्यामुळे ते अधिक खास ठरत आहे. ते फक्त दिल्लीपुरताच सीमीत न राहता, मुंबईतही या हॉटेलची शाखा येत्या काळात सुरु करण्याचा विराटचा मानस आहे.


विराटचे one8 commune हे हॉटेल दिसायला जेवढे आलिशान आहे, तेवढाच त्यातील खाद्यपदार्थ देखील खास आहेत. विराटच्या आवडीचे हटके पदार्थ या मेन्यूमध्ये आहेत, जे तुमचेही लक्ष वेधून जाणारे आहेत. सुपरफूड सॅलड, मशरुम गुगली, क्विनोआ बोल आणि इतरही पदार्थ जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच आरोग्यास पूरक आहाराची जाणिव करणारे आहेत.


विराटने आरोग्यास पूरक आणि तितक्याच चवीच्या पदार्थांसाठी शेफला फक्त त्याच्या आवडीनिवडी सांगितल्या आणि त्यानंतरची सारी किमया हॉटेलच्या शेफने केली. दिल्लीतील एका पंजाबी आणि मांसाहार प्रेमी कुटुंबातील विराट सध्या शाकाहाराला प्राधान्य देतो. त्याचबरोबर तो जवळपास ९० टक्के व्हिगनही असल्यामुळे आहारातील त्याच्या या सवयी हॉटेलच्या मेन्यूतही परावर्तित होत आहेत. तेव्हा दिल्लीला कधी गेलात तर विराटच्या one8 commune या हॉटेलला आवर्जुन भेट द्या.

Leave a Comment