अन्नदान ! गरजूंना जेवण मिळण्यासाठी मुंबईत लावण्यात आले रेफ्रिजरेटर

अन्न वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि गरजूंना मिळावे या उद्देशाने अंधेरी येथे सार्वजनिक रेफ्रिजरेटर लावण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब असणारे दुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत येथून जेवण घेऊ शकतात. या सेवेची सुरूवात वर्सोवा वेलफेअर असोसिएशन आणि अंधेरीतील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्थानिक रहिवासी प्रिती खुराना यांनी सांगितले की, शहरातील लोखंडवाला, वर्सोवा, ओशिवारा, डीएन नगर  आणि मीरा रोड या पाच ठिकाणी या प्रकारची सेवा सुरू करण्यात आली आहे. फ्रिजमध्ये जेवण ठेवण्याची जबाबदारी पाच ठिकाणांवरील स्थानिक लोक आणि वर्सोवा वेलफेअर सोसायटीची आहे.

यासाठी पहिला फ्रिज जानेवारीमध्ये ठेवण्यात आला होता. दुसरा फ्रिज 18 मे रोजी ठेवण्यात आला. यानंतर आता 5 फ्रिज ठेवण्यात आलेले आहेत. येथून जेवण घेऊन जाणाऱ्यांमध्ये मजूर, रिक्षाचालक आणि बीएमसी वर्करचा समावेश आहे. जेवण वाया जाऊ नये व गरजूंना उपयोगी पडावे, या दृष्टीने या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.

ओशिवारातील मोर्या क्लासिक सोसायटी केवळ फ्रिजची काळजीच घेत नाही तर, फ्रिजद्वारे येणारे बिल देखील भरतात. या फ्रिजमध्ये व्हेज जेवणच ठेवले जाते. यामध्ये चपाती, ताजी फळे, बर्गर आणि वडापाव अशा गोष्टी ठेवल्या जातात. जेवण ठेवण्यासाठी लोकांची नावे ठरविण्यात आली आहेत, त्यानुसार त्या त्या दिवशी प्रत्येक जण फ्रिजमध्ये जेवण ठेवतो.