गोव्यातील या गावात चक्क फोटोसाठी टॅक्स

गोवा फिरण्यास भारतीय आणि परदेशी नागरिकांची पहिली पंसती असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. लोक गोव्याचे सौंदर्य टिपण्यासाठी असंख्य फोटो काढत असतात. मात्र आता गोव्यातील एका गावाने फोटो काढण्यासाठी कर लावला आहे. जेव्हा एका व्यक्तीने फोटोसाठी 500 रूपयांचा टॅक्स भरला व त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा हे प्रकरण समोर आले.

गोव्यातील पर्रा गावात फोटो अथवा व्हिडीओ काढण्यासाठी जागेजागेवर स्वच्छता कर देण्याचे बोर्ड लावले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे हे गाव आहे. याशिवाय येथील रस्त्यांवर आणि चर्चमध्ये शाहरूख व आलियाच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाचे देखील शुटिंग झाले होते. त्यामुळे हे गाव खूपच लोकप्रिय आहे.

या गावातील एक रस्ता खूपच सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे असल्याने येथील फोटो देखील सुंदर येतो. या ठिकाणी फोटो काढण्यासाठी येथे दिवसभर गाड्यांची ये-जा सुरू असते.

या गोष्टींमुळे स्थानिक लोक वैतागले आणि त्यांनी जागोजागी स्वच्छता कर नावाने बोर्ड लावले. त्यानंतर येथे फोटो आणि व्हिडीओसाठी 100 पासून 500 रूपयांपर्यंत कर लावण्यात येऊ लागला.

गावकऱ्यांच्या या करामतीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने देखील त्वरित कर बंद करण्यास सांगितले. या गावाप्रमाणेच इतरांनी देखील अशाप्रकारे कर लावण्यास सुरूवात केल्यास पर्यटनावर परिणाम होईल, यामुळे प्रशासनाने कर घेण्यास बंदी घातली.

Leave a Comment