महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच विराजमान होणार – सुधीर मुनगंटीवार


मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना अपेक्षित असलेली गुड न्यूज दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक असून मुख्यमंत्री त्यांच्या रुपाने शिवसैनिकच होणार अशी गुगली मुनगंटीवारांनी टाकल्यामुळे मुनगंटीवार यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला दुजोरा देतानाच शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याच्या मागणीवर पडदा टाकला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये भावाचे नाते आहे. शिवसेना-भाजपचे उद्धव ठाकरे हे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसैनिकच आहेत. त्यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्रात नितीन गडकरी परतणार नाही आणि ते मुख्यमंत्री होणार नसल्याचेही मुनगंटीवारांनी म्हटले आहे. भाजपची शिवसेनेसोबत युती असून त्यांच्यासोबतच सत्तास्थापन करण्याची आमची इच्छा आहे. भाजपचा दुसरा कोणताही विचार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आज दुपारी दोन वाजता आम्ही राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. पण सत्तास्थापनेचा दावा आज करणार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. भाजप स्थिर सरकार देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्तास्थापनेसाठी दावा कारायचा की नाही याबद्दल चर्चा करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. अकरा वाजताची वेळ राज्यपालांनी दुसऱ्या कोणालातरी दिली होती. आमची चर्चा साडेदहा ते अकरा या वेळात पूर्ण होणारी नव्हती. त्यामुळे आम्ही वेळ बदलून दुपारची मागितल्याचेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

आमदारांना धमकावण्याचे काम कुणीही करणार नाही. शिवसेना आणि भाजपचा आमदार फुटणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवारांनी दिली. आम्ही संजय राऊत यांचा आदर करतो, आम्ही डेडलॉक तोडण्यासाठी प्रयत्न करु, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री कोण हे संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. रा. स्व. संघ ही देशहितासाठी दक्ष असणारी संघटना आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना देश हितासाठी भेटू शकतात. संघाचे प्रेम हे भाजप नेत्यांवरही आहे, उद्धवजींवरही आहे आणि काँग्रेसवरही असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Leave a Comment