ज्युलिएटला पाठवा पत्र, थेट इटलीमधून मिळेल तुम्हाला उत्तर

इटलीचे सुंदर शहर वेरोना हे विल्यम शेक्सपिअरची प्रेमिका ज्युलिएटसाठी देखील प्रसिद्ध आहे. तिच्या नावाने येथे ज्युलिएट क्लब आहे. याठिकाणी जगभरातील भाषेत लिहिलेली पत्रे येतात. ही पत्रे प्रेमात पडलेले अथवा प्रेमात अपयशी झालेल्यांची असतात. अशी मान्यता आहे की, ज्युलिएटच्या नावाने पत्र लिहिल्याने लोकांना त्यांचे प्रेम मिळते.

मजेशीर गोष्ट म्हणजे असंख्य पत्रे ही ज्युलिएटच्याच नावाने येतात. शेक्सपिअरच्या नावाने एखादेच पत्र येते. या क्लबमध्ये शेकडो स्वयंसेवक आहेत, जे प्रेमाची नायिका ज्युलिएटच्या नावाने शेकडो पत्रांना उत्तरे देतात. पत्रांना उत्तरे देणाऱ्यांमध्ये भाषांतर करणारे, मनोवैज्ञानिक, डॉक्टर, लेखक असे अनेक लोक आहेत.

क्लबचे 41 वर्षीय सदस्य मार्टिन होपले यांनी सांगितले की, क्लबची लोकप्रियता एवढी आहे की, पत्ता म्हणून ज्युलिएट वेरोना, इटली एवढे लिहिले तरी योग्य ठिकाणी पत्र पोहचते. जगभरातून येणाऱ्या पत्रांमध्ये प्रेमात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे हे विचारले जाते.

होपले सांगतात की, लोकांना उत्तर मिळेल याच आशेने ते पत्र पाठवतात. क्लबमधील सदस्य देखील लोकांना संतुष्ट वाटेल अशीच उत्तरे देतात. पोस्टमन रोज पत्रांची पॉकिटे येथे सोडून जातो. क्लबचे सदस्य हे पत्रे वाचून उत्तरे देतात. सदस्यांना माहिती आहे की, उत्तराने काही प्रेम करणाऱ्यांच्या समस्येचे समाधान होणार नाही. मात्र ज्युलिएट लोकांच्या ह्रदयात जिंवत राहण्यासाठी ते पत्रांना उत्तरे देतात.

Leave a Comment