शास्त्रज्ञाने तयार केला डास न चावणारा साबण


मलेरियाच्या साथीने त्रस्त असलेल्या बुर्किना फासो या आफ्रिकी देशातील एका शास्त्रज्ञाने डास न चावणारी साबण तयार केली आहे. या साबणाने आंघोळ केल्यास डास चावत नाहीत, असा दावा या शास्त्रज्ञाने केला आहे.

पश्चिम आफ्रिकेत बसलेल्या बुर्किना फासो या देशात दरवर्षी मलेरियाने शेकडो लोक मरण पावतात. तसेच मलेरियारोधी कार्यक्रमासाठी कोट्यवधींचा खर्च होतो. तरीही आफ्रिका खंडात दरवर्षी ९ लाखांपेक्षा जास्त लोक मलेरियाचे बळी ठरतात.

त्यामुळेच नियोन डिको या शास्त्रज्ञाने हा साबण तयार केला आहे. फासो असे या साबणाचे नाव असून या साबणाचा विशिष्ट वास शरीराला चिकटून राहतो. त्यामुळे डास त्यापासून दूर राहतात, असे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या साबणासाठी एका स्थानिक वनस्पतीच्या रसाचा वापर केलेला आहे. त्यामुळे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. एकदा स्नान केल्यावर त्यामुळे सहा तास डास चावत नाहीत.

या साबणाच्या वापराने २०२० पर्यंत मलेरियाजन्य मृत्यूंची संख्या १ लाखाने कमी करण्याचे नियोन डिकोचे उद्दिष्ट आहे. “डास पळवणारे क्रीम आणि स्प्रे गरीब लोकांना परवडत नाहीत. शिवाय यातून साबणाने स्नान करणे आणि डास दूर पळविणे, हे दोन्ही एकत्रच होतात,” असे डिकोने सांगितले.