अखेर सापडल्या व्हायरल व्हिजिटिंग कार्डवाल्या गीता मावशी


कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. पण अनेक चांगल्या गोष्टी देखील त्यातून होतात. घरकाम करणाऱ्या मावशीच्या व्हिजिटिंग कार्डची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. व्हिजिटिंग कार्ड पुण्यात बावधनमध्ये काम मिळवण्यासाठी छापले पण इतरांना ते देण्याआधीच जगभर पोहचले. ही कमाल केवळ सोशल मीडिया शक्य झाली. त्यानंतर त्या गीता मावशीला एवढे फोन यायला लागले की शेवटी फोनच बंद करावा लागला. पुण्यातील बावधनमध्ये त्यांना काम हवे होते पण फोन मात्र पुणे, मुंबईसह देशभरातून येत आहेत. या व्हिजिटिंग कार्डची कल्पना सहज सुचली असली तरी त्या एका कल्पनेने केलेले काम लाखमोलाचे आहे.

कामाची बावधनच्या गीता काळे यांना गरज होती. त्यांना हे काम शोधायचे कसे याचीच चिंता होती. या एका व्हिजिटिंग कार्डने ती चिंता दूर केली. ज्यांच्या कल्पनेतून हे व्हिजिटिंग कार्ड तयार झाले त्या धनश्री शिंदेंनी फेसबुकवर त्यामागची कहाणी सांगितली आहे. मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या धनश्री यांनी त्यांचे ब्रँडिंगचे कौशल्य वापरून तयार केलेले हे व्हिजिटिंग कार्ड फक्त सोशल मीडियामुळे कुणालाही न देता जगभर चर्चेत आले. मावशींना सध्या देशभरातून फोन येत आहेत.

धनश्री शिंदे यांनी म्हटले की, बऱ्याच दिवसांनी घरी परतल्यानंतर गीता मावशीला जेव्हा काम करताना बघितले, तेव्हा ती चिंतेत असल्याचे जाणवले. तिच्या चिंतेचे कारण विचारले असता तिने हातातील काम गेल्याचे सांगितले. यात तिचा दोष नव्हता पण परिस्थितीमुळे काम बंद झाल्यामुळे तिला महिन्याला मिळणारे जवळपास 4 हजार रुपये बंद होणार होते.

गीता मावशीची कहाणी ऐकल्यानंतर धनश्री शिंदे यांच्या मनात आपण काहीतरी करावे असा विचार आला. जाहिरात, ब्रँडिग आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या धनश्री यांनी त्यांच्या कौशल्याचा वापर करायचे ठरवले. लगेच त्यांनी गीता मावशीला तिचे व्हिजिटिंग कार्ड काढू असे सांगितले. घर कामासाठी मावशी पाहिजे असेल अशा लोकांपर्यंत ते वॉचमन किंवा इतरांमार्फत पोहचवता येईल असा विचार केला. व्हिजिटिंग कार्डची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मावशींकडून त्यांचे काम आणि त्या कामाचे दर विचारले. तसेच सध्याची गरज म्हणून आधार कार्ड नंबरदेखील टाकला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 100 कार्ड प्रिंट काढून आणली.

धनश्री शिंदेंनी व्हिजिटिंग कार्ड छापून घरी आणल्यानंतर त्यातील काही कार्ड त्यांच्याकडे ठेवून घेतली आणि उरलेली गीता मावशीकडे दिली. त्यानंतर हे कार्ड फक्त एका दिवसाच्या आत सोशल मीडियावर एवढे व्हायरल झाले की गीता मावशीला फोन बंद करावा लागला. त्या कार्डचा फोटो धनश्री शिंदेंनी मित्रासोबत शेअर केला होता. तो अनेक ग्रुपमध्ये त्यांनी शेअर केला आणि व्हायरल झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

धनश्री शिंदे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना आता गीता मावशींना काम मिळाले असल्याचे सांगितले. गीता मावशींच्या कार्डवर असलेल्या नंबरला आता धनश्रीच उत्तर देत आहेत. गीता मावशींना वेगवेगळ्या रेडिओ आणि टीव्ही माध्यमांकडून कॉल येत आहेत. मावशींना जेव्हा विचारण्यात आले की तुम्हाला बावधनमध्ये काम मिळाले का? त्यावर मिळाले असून सध्या तरी कामाची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment